नाशिक : तहसीलदार अहिरराव यांचा अखेर राजीनामा

तहसीलदार राजश्री अहिरराव राजीनामा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या वर्षभरापासून राजीनाम्याच्या चर्चेेत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी अखेर गुरुवारी (दि.२६) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. २०२४ मध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघामधून अहिरराव इच्छुक असल्याची चर्चा आहे. मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क वाढविताना विविध उपक्रमही राबविले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या रोषालाही अहिररावांना सामाेरे जावे लागले होते.

तहसीलदार अहिरराव यांनी शासनाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. राजीनाम्यानंतर त्या काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशिक तहसीलदारपदाची धुरा सांभाळताना अहिरराव यांनी देवळाली मतदारसंघासोबत ग्रामीण भागात ग्रामस्थांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांना रेशनकार्ड, विविध दाखले वितरणासाठी त्यांनी शिबिर घेतल्याने त्या प्रकाशझोतात आल्या. त्यामुळे अहिरराव विरुद्ध विद्यमान आमदार सराेज अहिरे यांच्यामध्ये वाद वाढत गेला. आ. अहिरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे अहिरराव यांच्याविरोधात तक्रारी केल्या. त्यावरून गंगाथरन डी. यांनी अहिरराव यांना दोनदा कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.

आरोप अन‌् वाद

२०१९ च्या निवडणुकीमध्ये अहिरराव इच्छुक होत्या. राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांना उमेदवारीसाठीही विचारणा केली. परंतु, त्यांनी साफ नकार दिल्याने राष्ट्रवादीने अहिरे यांना उमेदवारी देत निवडूनदेखील आणले. मध्यंतरीच्या काळात अहिरे यांनी तहसीलदार अहिरराव व त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यावर कामे थांबविल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अहिरराव वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

आपल्या वैयक्तिक कारणास्तव शासनाकडे आपण राजीनामा सादर केला आहे. अद्याप माझा राजीनामा मंजूर झालेला नाही. तो मंजूर झाल्यानंतर भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे याचा निर्णय घेणार आहे. राजकारणामध्ये प्रवेशाबद्दल अजूनही कोणताच निर्णय घेतलेला नाही.

– राजश्री अहिरराव, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय

 

अनेक पक्षांचे पर्याय

गेल्या चार वर्षांत राज्यातील राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. भाजपसोबत शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट तसेच काॅंग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. पक्षांच्या या फाटाफुटीमुळे २०२४ ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमधून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यातही देवळालीमधून विद्यमान आ. अहिरे यांच्यासह माजी आमदार योगेश घोलप इच्छुक आहेत. अहिरराव यांना विविध पक्षांचे पर्याय खुले असणार आहे. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या काळात भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना विचारणा झाल्याचे समजते.

हेही वाचा :

The post नाशिक : तहसीलदार अहिरराव यांचा अखेर राजीनामा appeared first on पुढारी.