नाशिक : तालासुरांसह नृत्याने श्रीरामाला वंदन

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
श्री काळाराम मंदिराच्या आवारात संगीताच्या माध्यमातून अनोखी श्रीराम परिक्रमा करण्यात आली. काळाराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून झालेल्या श्रीराम परिक्रमेमध्ये एकाच वेळी 600 कलाकारांनी केलेल्या सादरीकरणाने नवरात्रोत्सवाला रंगत आणली.

मंदिर परिसरातील सायंकाळ या संगीतमय वातावरणाने फुलली होती. तबलावादन, नृत्य, बासरीवादन भरतनाट्यम, कथ्थक नृत्य, आणि गायन अशा विविध कलांच्या संगमाची अनुभूती उपस्थितांना मिळाली.

मंदिराच्या गर्भगृहाच्या पायर्‍यांवर बासरीवादक पारंपरिक पोशाख करून आपले वादन कौशल्य सादर करण्यास बसले होते.

तबलावादक

गर्भगृहासमोरील बाजूस संपूर्ण मंदिराला घेऊन तबलावादक आपल्या वादन कलेतून रामरायाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत होते.

भरतनाट्यम तसेच कथ्थक नृत्य सादर करणार्‍या नृत्यांगना पारंपरिक पोशाखात आपली सेवा रामरायाच्या चरणी अर्पण करताना दिसत होत्या. हा नयनरम्य आणि वातावरण मंत्रमुग्ध करणारा सोहळा पाहण्यासाठी पंचवटी तसेच आसपासच्या परिसरातील भाविक व रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. बासरीच्या सुराला तबल्याची साथ देणारे विद्यार्थी व त्या तालावर ठेका धरणार्‍या नृत्यांगना हे विलोभनीय दृश्य पाहताना रसिक प्रेक्षकांना स्वर्गसुखाची अनुभूती झाली.

पारंपरिक रथोत्सव तसेच नवीनच उद्भवलेले वेदोक्त प्रकरण यामुळे मंदिरात तसेच मंदिराबाहेरील इतर परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची अधिकची कुमक मंदिर परिसरात दाखल झालेली असल्याने मंदिराला छावणीचे स्वरूप आले होते. या कार्यक्रमात पवार तबला अकादमी, आदिताल तबला अकादमी, नादसाधना संगीत निकेतन, स्वरदीप संगीत विद्यालय, बासरी प्रशिक्षण वर्ग, नृत्यानंद कथक नृत्यसंस्था, नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी, के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रसिद्ध तबलावादक नितीन पवार व नितीन वारे यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमास गिरीश पांडे, सुजित काळे, रसिक कुलकर्णी, दिगंबर सोनवणे, रूपक मैंद, कुणाल काळे, अमित भालेराव, आशुतोष इप्पर, अथर्व वारे, अद्वय पवार, संकेत फुलतानकर, सौरभ ठकार आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त अजय निकम, मंदार जानोरकर, धनंजय पुजारी यांनी संयोजन केले होते.

The post नाशिक : तालासुरांसह नृत्याने श्रीरामाला वंदन appeared first on पुढारी.