नाशिक : तीन अपत्य असल्याने धानपाड्याचे उपसरपंच अपात्र

उपसरपंच अपात्र,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेठ तालुक्यातील धानपाड्याच्या उपसरपंचाला तीन अपत्ये असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी पद रद्द करण्याबाबत आदेश दिले असून, रमेश दरोडे असे कारवाई झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश दरोडे यांची दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी धानपाड्याच्या उपसरपंचपदी निवड झाली हाेती. मात्र, त्यांच्या निवडीला गावातीलच दत्तू दुंदे यांनी थेट अपर जिल्हाधिकारी पारधे यांच्याकडेच हरकत घेतली होती. दरोडे यांना दोन मुले व मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. त्यापैकी एका मुलाचा जन्म २००९ मध्ये, २०१२ ला दुसऱ्याचा मुलाचा आणि २०१५ मध्ये मुलीचा जन्म झाल्याचे पुरावे दुंदे यांनी पारधे यांच्याकडे सादर केले होते. दरोडे यांनी शासनाची फसवणूक करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) चे पोटकलम (ज-१) चा भंग केला आहे. त्यामुळे दराेडे यांना अपात्र घोषित करताना जाणूनबुजून खरी माहिती दडवून ठेवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी दुंदे यांनी केली.

अपर जिल्हाधिकारी पारधे यांच्याकडे गुरुवारी (दि.२५) या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी दुंदे यांच्या तक्रारीत त‌थ्य आढळल्याने पारधे यांनी दरोडे यांना उपसरपंच म्हणून अपात्र घोषित केले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार दरोडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले. या आदेशामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तीन अपत्य असल्याने धानपाड्याचे उपसरपंच अपात्र appeared first on पुढारी.