नाशिक : दीड महिन्यात २६ गुन्हेगारांना मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया वाढवल्या आहेत. त्यानुसार दीड महिन्यात शहरातील तीन टोळ्यांमधील २६ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई झाली आहे. पंचवटीतील गोळीबार करणाऱ्या चौघांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर ११ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात सराईत गुन्हेगारांनी भररस्त्यात गुन्हे करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी मोक्का, स्थानबद्ध, तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत. त्यापैकी शहरातील पंचवटी, कार्बन नाका व सिडको परिसरात गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाया केल्या आहेत. त्यातील सातपूर आणि सिडकोतील गुन्हेगारांवर एप्रिल महिन्यात, तर पंचवटी प्रकरणातील चौघांवर रविवारी (दि. २८) मोक्का लावण्यात आला आहे.

पंचवटीतील गोळीबाराचे प्रकरण

दि. ११ मार्च २०२३ रोजी रात्री 8.30 ला फुलेनगर परिसरात प्रेम दयानंद महाले आणि त्याचा मित्र युवराज शेळके यांच्यावर संशयितांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात धारदार शस्त्रांचा वापर व गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एक श्वान जखमी झाला होता. या प्रकरणात संशयित गुन्हेगार आणि टोळीचा सूत्रधार विशाल चंद्रकांत भालेराव (३२), विकास उर्फ विक्की विनोद वाघ (२५), जय संतोष खरात (१९) आणि संदीप रघुनाथ आहिरे (२०, सर्व रा. फुलेनगर) यांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, हप्तेखोरीसह अवैध शस्त्रांचा वापर असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यांच्यावरही मोक्का

दि. १९ मार्च २०२३ रोजी पूर्ववैमनस्यातून तपन जाधव याच्यावर सातपूर एमआयडीसीतल्या कार्बन नाक्यावर गोळी झाडली होती. या प्रकरणी संशयित आशिष राजेंद्र जाधव आणि गणेश राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, भूषण किसन पवार, रोहित मंगलदास अहिरराव, किरण दत्तात्रेय चव्हाण आणि सोमनाथ झांजर ऊर्फ सनी यांच्यावर मोक्का लावण्यात आला. तर १६ एप्रिलला राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील सूत्रधार किरण दत्तू शेळके, जयेश हिरामण दिवे, विकी कीर्ती ठाकूर, गौरव संजय गांगुर्डे, किरण ज्ञानेश्वर क्षीरसागर, सचिन पोपट लेवे, किशोर बाबूराव वाकोडे, राहुल अजयकुमार गुप्ता, अविनाश गुलाब रणदिवे, श्रीजय संजय खाडे, जनार्दन खंडू बोडके, सागर कचरू पवार, पवन दत्तात्रेय पुजारी आणि महेंद्र ऊर्फ गणपत राजेश शिरसाट यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दीड महिन्यात २६ गुन्हेगारांना मोक्का appeared first on पुढारी.