नाशिक : तुमचे आधारकार्ड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने आहे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) महत्त्वाची घोषणा ट्विटरद्वारे केली. त्यानुसार तुमचे आधारकार्ड घेतल्यापासून 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला नव्याने कागदपत्रे (पत्ता आणि ओळख) अपडेट करावे लागणार आहे. कागदपत्रांची प्रोसेस ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. ऑनलाइन सेवा 14 जूनपर्यंत मोफत असणार आहे.

अशी आहे प्रोसेस….
सर्वप्रथम यूआयडीआयए वेबसाइट किंवा
myaadhar.uidai.gov.in या लिंकवर किंवा अ‍ॅपवर लॉगइन करून आधार क्रमांक, कॅप्चा टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. ओटीपी टाकल्यानंतर पुढील पेजवर सर्वांत शेवटी कागदपत्रे अपडेटचा पर्याय दिसेल. नंतर कोणते कागदपत्र हवे ते वाचून पुढे जा. तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता दिसेल ते तपासून नेक्स्ट बटणावर क्लिक करा. पुढे कागदपत्रे अपलोड करता येईल. जेपीजी, पीएनजी, पीडीएफ फॉरमॅटमध्ये 5 एमबीपर्यंत फाइल अपलोड करता येते. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते कागदपत्रे लागतील याची यादी दिसेल. त्यातील कोणतेही कागदपत्रे तुम्ही देऊ शकता. उदा : पॅनकार्ड सिलेक्ट केले तर अपलोडवर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो टाकता येतो किंवा कॅमेरा पर्याय निवडून फोटो काढता येतो. ओके बटनावर क्लिक करून सबमिट करा. त्यानंतर एक रिसिट येईल ती डाउनलोड करून ठेवा. त्यानुसार तुमचा अर्ज कोणत्या स्टेजला आहे ते दिसेल. सात दिवसांत कागदपत्रे व्हेरिफाय केले जातात. सेवा मोफत आहे तोपर्यंत कागदपत्रे अपडेट करून घ्या. मुदतीनंतर जादा शुल्क भरावे लागतील. डिजिटल इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकांना (माय आधार) पोर्टलवरच केवळ मोफत कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा असणार आहे. मोफत सुविधा केवळ 15 मार्च ते 14 जूनपर्यंत असणार आहे. आधार केंद्रावर यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या 1200 सरकारी योजनांसाठी आधारकार्डचा आजवर वापर केला आहे. आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण अधिनियम 2016 नुसार आधार क्रमांकधारक आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी माहितीची अचूकता कायम असल्याचे निश्चित करण्यासाठी कागदपत्रे किमान एकदा अपडेट करावे लागते.

* 50 रुपये शुल्क आधार केंद्रावर आकारले जाईल
* 1200 योजनांसाठी केंद्र/राज्य सरकारच्या सरकारी आधारकार्डचा होतो वापर
* मोफत सुविधा केवळ 15 मार्च ते 14 जूनपर्यंत असणार आहे.
* माहितीची अचूकता कायम असल्याचे निश्चित करण्यासाठी किमान एकदा अपडेट करावे.

हेही वाचा:

The post नाशिक : तुमचे आधारकार्ड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने आहे का? appeared first on पुढारी.