नाशिक ते सिन्नर महामार्गाची दुरावस्था; राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गडकरींना निवेदन

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; येथील नाशिक ते सिन्नर महामार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्विसरोड वर पथदीप नाही, रस्त्यावर खड्डे पडलेले असून संबधित कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशी तक्रार नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करून याप्रकरणी लक्ष पुरविण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक – पुणे महामार्गावरील नाशिकरोड (नाशिक) शहर ते सिन्नर गाव या मार्गावरील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे जिवघेणे खड्डे पडलेले असून वाहने चालवताना वाहनधारकांना जीवमुठीत धरुन वाहने चालवावे लागतात. नाशिक ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्यावर पळसे, शिंदे, बंगाली बाबा, चिंचोली फाटा, आर्किटेक कॉलेज या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी उपरस्ते झाले मात्र आज त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय गेली ५ – ६ वर्षांपासून सर्व्हिस रोडवरती लाईटची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी महिलांच्या गळ्यातील चैन स्नॅचिंग होते. त्यामुळे महिला असुरक्षित झाल्या आहेत. आज तागायत सर्व्हिस रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. चेतक रोडवेज कंपनीने रस्त्यांचे डांबरीकरण तसेच रस्त्यालगत पथदीप बसविण्याचे आश्वासन दिले. आश्वासनाला पाच सहा वर्षे उलटून गेले आहे. मात्र अद्याप कामे पुर्ण केलेली नाही. याविषयी चेतक टोलवेजचे शिंदे टोलनाका येथे असलेल्या कार्यालयाशी सतत वारंवार संपर्क साधून काम पुर्ण करण्याची मागणी केली. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते. आश्वासनाची पुर्तता केली जात नसुन केवळ वेळ मारुन नेण्याचे काम टोलवेज कंपनी करत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते.

The post नाशिक ते सिन्नर महामार्गाची दुरावस्था; राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गडकरींना निवेदन appeared first on पुढारी.