नाशिक : ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांवर अटकेची टांगती तलवार

नाशिक पोलिस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आंतरजिल्हा बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीसाठी जळगाव, पालघर पोलिस अधीक्षकांसह बृहन्मुंबई आयुक्तांसोबत नाशिक तालुका पोलिसांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र, संबंधित कर्मचार्‍यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांचे पथके या कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवेच्या ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांसाठी काही पोलिसांनी नातेवाइकांच्या गंभीर आजारांसह शस्त्रक्रियेचे अहवाल सादर केल्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचे भिंग फुटले होते. या प्रकरणी अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज आणि सिव्हिलचा लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे हे न्यायालयीन कोठडीत आहे. तर अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. निखील सैंदाणे हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत.

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे अहवाल देणार्‍या कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. चौकशीत काहींचे विनंती अहवाल असून, त्यात फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. सुमारे वीस अर्जदारांपैकी काही पोलिसांचे अहवाल सदोष असल्याने अधीक्षक कार्यालयातील लिपिक कनोज यांच्या अडचणी वाढल्या आहे. तर, वैद्यकीय अधिकार्‍यांनी अर्ज चौकशीनंतर कर्मचार्‍यांना खासगी डॉक्टरांकडून संबंधित अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही खासगी डॉक्टरांच्या चौकशीच्या फेर्‍या अडकणार आहे.

श्रीवास व सैंदाणे यांची हाय कोर्टात धाव ? :

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. निखील सैंदाणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळण्यात आले आहेत. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.

 हेही वाचा  :

The post नाशिक : ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांवर अटकेची टांगती तलवार appeared first on पुढारी.