नाशिक : दहिवडला वादळी पावसाने उडाले शाळेचे पत्रे

शाळेचे पत्रे उडाले,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

दहिवड (ता.देवळा) येथे जोरदार वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन ते चार वर्गखोल्यांचे छताचे एका बाजूचे पत्रे उडाले. यामुळे शाळेच्या या वर्गखोल्यांमधील साहित्य ओले झाले. याशिवाय खारीफाटा येथील दहिवड रोडवरील एक व मालेगाव रोडवरील एक असे दोन कांद्याचे शेड वाऱ्याने कोसळले.

बुधवार (दि .८) दहिवड परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने कांदा, गहू, मका, पपई, डाळिंब आदी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दक्षिण बाजूकडील पत्रे उत्तर बाजूकडे उडून गेले. त्यामुळे या प्रत्येक वर्गात पाणी साचले. सुदैवाने शाळा दुपारीच सुटली असल्यामुळे विद्यार्थी नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. शासनाने शाळेचे उडालेले पत्रे त्वरीत बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

देवळा शहरासह तालुक्यात जोरदार मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गांत चिंतेचे वातावरण आहे. वाखारीच्या कापराइ शिवारात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. तर विठेवाडी, भऊर, खामखेडा व इतर गावशिवारात जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या द्राक्षबागा, शेतात उभा असलेला व काढणीला आलेला गहु, हरबरा, ऐन उमेदीत असलेला रब्बी कांदा, तसेच काढून शेतात घोड्या घालून पडलेला लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दहिवड येथील रघुनाथ त्रंबक पवार यांच्या पपईच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने पपयांचे नुकसान झाले.

“निसर्गाची अवकृपा, शासनाची धरसोड वृत्ती या दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला कोणी वाली नाही. अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात आहे. शासनाने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.”

कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा :

The post नाशिक : दहिवडला वादळी पावसाने उडाले शाळेचे पत्रे appeared first on पुढारी.