नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात शेतकरी एकवटले असून, येत्या १६ जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून बिऱ्हाड मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. दिंडोरी, चांदवड, निफाड, कळवण, देवळा, सुरगाणा आदी तालुक्यांतील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनःगर्ठन करत गेल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढत गेली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने अंदाजे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी आदी मागण्या केल्या जाणार आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जाची जुलमी वसुली सुरू करण्यात येत आहे. वाहनांचा लिलाव, जमिनीवर बोजे लावण्याचे काम सुरू केले आहे. वसुलीदरम्यान दादागिरीचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सर्वांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. मोठ्या थकबाकीदारांबाबत काय कारवाई केली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या विरोधात १६ जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पुढच्या पंधरवड्यात शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आम्हाला कर्जमाफी नको, पण योग्य पद्धतीने वसुली आवश्यक असल्याच्या मागणीसाठी आठ दिवस आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले. नाशिकच्या शेतकऱ्याने जगाला आंदोलनाची दिशा दाखवली आहे. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आठ दिवस ठिय्या मांडून बसण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अर्जुन बोऱ्हाडे, संदीप जगताप, अमृता पवार, सचिन बर्डे, ॲड. सुनील जावळे, पांडुरंग गणोरे, नितीन आहेर, शांताराम ढगे, गंगाधर निखाडे, प्रशांत कड, वसंत कावळे, संतोष रेहेरे, ॲड. विलास निरगुडे, बाळासाहेब घडवजे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा appeared first on पुढारी.