नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक

विमानसेवा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक देण्यात आला आहे. स्पाइस जेटने या सेवेला २० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान, कंपनीने सेवा बंद करण्यामागे तांत्रिक कारण सांगितले असले तरी, पुन्हा एकदा राजकीय अनास्थळेमुळेच ही सेवा बंद झाल्याची चर्चा उद्योजक तसेच व्यावसायिकांमध्ये रंगत आह

नाशिक ओझर विमानतळावरून गेल्या नोव्हेंबरपर्यंत स्पाइस जेट, अलायन्स एअर व स्टार एअर अशा तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. मात्र, यापैकी दोन कंपन्यांनी अचानक सेवा बंद केली. त्यानंतर केवळ स्पाइस जेटची नवी दिल्ली व हैदराबाद ही सेवा सुरू होती. १५ मार्चपासून इंडिगोने नागपूर, गोवा व अहमदाबादसाठी सेवा सुरू केली. ती सुरू होत नाही, तोच स्पाइस जेटची हैदराबाद सेवा स्थगित करण्यात आली. आता नवी दिल्ली सेवाही मंगळवार (दि.१८)पासून येत्या २० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, नाशिक-नवी दिल्ली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मे महिन्यात सुट्यांमुळे नाशिकमधून अनेक प्रवाशांनी बुकिंग केले होते. स्पाइस जेटच्या या निर्णयामुळे त्यांच्या नियोजनावर पाणी फेरले जाणार आहे. या प्रवाशांना नवी दिल्लीला जाण्यासाठी शिर्डी किंवा मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. त्यामुळे उद्योग व पर्यटन क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिर्डी, मुंबई सेवेतही कपात

स्पाइस जेट कंपनीने नाशिकसह शिर्डी, मुंबई येथील काही विमानसेवा बंद केल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीकडे पुरेशी विमाने नसल्याने या सेवेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अचानक बंद केलेल्या सेवेचा नाशिकच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.

आठवड्यातून तीनदा सेवा

सेवा पूर्णत: बंद करण्याऐवजी ती अंशत: सुरू ठेवण्याचा प्रयत्न स्पाइस जेटकडून सुरू असल्याचे कळते. यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असून, नाशिक-नवी दिल्ली सेवा दररोजऐवजी आठवड्यातून तीनदा देण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोट

स्पाइस जेटने नाशिकच नव्हे तर अन्यत्रही सेवेत कपात केली आहे. कंपनीने सेवा कायमची बंद केली, असे म्हणता येणार नाही. त्यांचे स्लॉट अद्याप राखीव असून, सेवा पुन्हा सुरू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

– मनीष रावल, प्रमुख, आयमा एव्हिएशन कमिटी

हेही वाचा : 

The post नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक appeared first on पुढारी.