नाशिक : दिवसाची सुरुवात करा सुंदर हास्याने…! शहरातील ११५ हास्यक्लबमध्ये २ हजारांपेक्षा जास्त सदस्य

हास्यक्लब नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हसणे ही माणसाला मिळालेली सर्वांत सुंदर देणगी आहे. नवीन व्यक्तीला भेटल्यावर ‘स्माइल’ दिली जाते. यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार होते. याच हास्याने रोज सकाळची सुरुवात झाली तर…? १३ मार्च १९९५ मध्ये डॉ. मदन कटारिया व माधुरी कटारिया यांनी लोखंडवाला काॅम्लेक्स मुंबई, येथे ५ लोकांना घेऊन पहिला हास्य क्लब सुरू केला. त्यानंतर १९९६ मध्ये कै. देवेंद्र जावरे यांनी नाशिकमध्ये नासर्डी ब्रीज येथे पहिल्या नंदिनी हास्य क्लबची स्थापना केली. आज शहरात एकूण ११५ हास्यक्लब असून, २ हजारांपेक्षा जास्त सदस्य या क्लबशी जोडले गेले आहेत.

मनपाच्या वतीने गार्डन, हॉल हास्यक्लबसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. सकाळी ६.६० ते ७.३० आणि सायंकाळी ५.३० ते ६.३० अशा दोन सत्रांत शहराच्या विविध भागांत हास्यक्लबच्या माध्यमातून हास्ययोगा घेतला जाताे. लोकांच्या आयुष्यातील तणाव घालवण्यासाठी ‘हास्ययोगा’ रामबाण उपाय असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. व्यसनाधीनता, अपंगत्व किंवा मानसिक शारीरिक आजार बरे होण्यास मदत होते. हास्यक्लब म्हणजे लोक एकत्र येऊन दररोज हास्ययोगा करतात. यामुळे रोजचे भेटणे, गप्पागोष्टी यामुळे माणसाच्या आयुष्यातील निम्मा ताण कमी होतो. क्लबमध्ये नमस्ते लाफ्टर (एकमेकांना स्माइल देणे), लायन लाफ्टर (जीभ बाहेर काढून हसणे), हार्टी लाफ्टर (आकाशाकडे बघून हात वर करून हसणे), प्राणायाम, योगा हास्यक्लबमध्ये केले जातात. निखळ हास्याने दिवसाची सकारात्मक सुरुवात झाल्यावर मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हास्यक्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. हास्यदरबार जिथे हास्य श्रीमान, हास्य श्रीमती, हास्ययोगी, हास्ययोगिनी सारखे पुरस्कार दिले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच मे महिन्यातील पहिला रविवार ‘हास्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज भारतात व जगभरात अनेक हास्यक्लब स्थापन झाले आहेत. जगात आजच्या घडीला १२० देशांमध्ये हास्यक्लब कार्यरत आहेत. शहरातील हास्यक्लबमध्ये समन्वय साधण्यासाठी, विविध उपक्रम राबवून सभासदांना हास्ययोगासंबंधी नवीन माहिती देण्यासाठी जिल्हा हास्ययोग समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये हास्यनगरीची उभारणी

लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे संस्थापक कटारिया दाम्पत्य जागतिक हास्ययोगाचे मुख्यालय नाशिकमधील विल्होळी येथे लवकरच स्थापन करणार आहेत. ज्याची ओळख ‘वर्ल्ड लाफ्टर सेंटर’ अशी असेल. जिथे प्रशिक्षण केंद्र, कार्यशाळा, परिषद तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांना भेट देता येईल.

हास्ययोग आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. हास्ययोग हा व्यायाम सांघिकरीत्या केला जात असल्यामुळे त्यात नियमितपणा अधिक असतो. त्यामुळे इतर व्यायाम प्रकारापेक्षा हास्ययोग व्यायाम जास्त परिणामकारक ठरतो.

– ॲड. वसंतराव पेखळे, अध्यक्ष, जिल्हा हास्ययोग समन्वय समिती

 

हसण्याने माणसं एकमेकांशी जोडली जातात. हास्यामुळे अनेक मानसिक आजार कमी होतात. आयुष्य तणावमुक्त झाल्याने प्रतिकारशक्ती वाढते, हॅपी हार्मोन वाढतात, त्यामुळे आजारपण आपोआप कमी होतात.

– डॉ. सुषमा दुगड, उपाध्यक्षा

हेही वाचा : 

The post नाशिक : दिवसाची सुरुवात करा सुंदर हास्याने...! शहरातील ११५ हास्यक्लबमध्ये २ हजारांपेक्षा जास्त सदस्य appeared first on पुढारी.