नाशिक : दुचाकी चोरट्यास न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा

दुचाकी चोरट्यास कारावास,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुचाकी चोरट्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी मंगळवारी (दि.१३) तीन महिने साधा कारावास आणि दोनशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अफताफ अली अस्लम अली (१९, रा. मालेगाव, ता. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

एप्रिल २०२२ मध्ये सुनील श्रावण डगळे (२४, रा. कर्णनगर, पंचवटी) यांची स्वमालकीची दुचाकी (एचएच १५, एसएच ७९९१) इमारतीच्या वाहनतळावरून संशयित अली याने संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस नाईक जी. एस. माळवाळ यांनी तपासाची चक्रे फिरवून अलीविरोधात सबळ पुरावे गोळा केले. त्यानंतर माळवाळ यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दोषारोप दाखल केले.

खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सुरू होती. परिस्थितीजन्य पुराव्यासह साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी अलीला तीन महिने साधा कारावास आणि दोनशे रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून जी. आर. बोरसे यांनी काम पाहिले. तर कोर्ट अंमलदार म्हणून पोलिस नाईक व्ही. ए. नागरे, महिला पोलिस शिपाई पी. पी. गोसावी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

हेही वाचा :

The post नाशिक : दुचाकी चोरट्यास न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.