नाशिक : बाफणा हत्याकांड प्रकरणी दोघे दोषी तर तिघे दोषमुक्त, गुरुवारी सुनावणार शिक्षा

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभर गाजलेल्या बिपीन बाफना हत्याकांड प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यांनी मंगळवारी (दि.१३) सबळ पुराव्याच्या आधारे मुख्य पाच संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरविले असून इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दोषी ठरविलेल्यांमध्ये चेतन पगारे आणि अमन जट या दोघांचा समावेश आहे. तर न्यायालयाने अक्षय सुळे, संजय पगारे आणि पम्मी चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. शिक्षेचा निर्णय न्यायालयाने दोन दिवसांसाठी राखून ठेवला आहे.

मयत बिपीन गुलाबचंद बाफणा (२२, रा. वंसतविहार, ओझर, ता. निफाड) हा ८ जून २०१३ रोजी नृत्य क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. हीच संधी साधून संशयित आरोपी चेतन यशवंतराव पगारे (२५, रा. ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा, केवडीबन, पंचवटी), अक्षय उर्फ बाल्या सूरज सुळे (२१, रा. नांदूरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड) यांनी पंचवटीतून बिपीनचे अपहरण केले होते. तसेच फोनद्वारे बिपीनच्या वडिलांकडे एक कोटीची खंडणी मागितली होती.

बिपीनच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासची चक्रे फिरवून संशयितांना जेरबंद करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, संतप्त झालेल्या संशयितांनी बिपीनची निघृणपणे हत्या केली. १४ जून २०१३ रोजी बिपीनचा मृतदेह आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात आढळून आला होता. अपहरण, खंडणी आणि हत्या यामुळे संपुर्ण राज्यभर बाफना हत्याकांड चर्चेत आले हाेते. पोलिसांनी तपासाला गती देत मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) लावला होता.

गुरुवारी शिक्षा ठोठावणार

बहुचर्चित बिपीन बाफना हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत ३५ साक्षीदार तपासण्यात आले आहे. अंतिम सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयाने चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरविले आहे. तर न्यायालयाने अक्षय सुळे, संजय पगारे आणि पम्मी चौधरी यांना दोषमुक्त केले आहे. पगारे व जट या दोघांना गुरूवारी (दि.१५) न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. त्यामुळे दोघांना काय शिक्षा मिळते? याकडे संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

बिपीन बाफना हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरविले आहे. तर अक्षय उर्फ बाल्या सूरज सुळे, संजय रणधीर पवार, आणि पम्मी भगवान चौधरी या तिघांना निर्दोष मुक्तता केली. त्यांच्याविरुद्ध गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सबळ परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयापुढे आले नाही. त्यामुळे न्यायालयांनी त्यांना या गुन्ह्यात निर्दोष ठरविले.

-अजय मिसर, सरकारी वकील

हेही वाचा :

The post नाशिक : बाफणा हत्याकांड प्रकरणी दोघे दोषी तर तिघे दोषमुक्त, गुरुवारी सुनावणार शिक्षा appeared first on पुढारी.