नाशिकमध्ये बारा लाखांचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची धाड

नाशिक(सातपूर): पुढारी वृत्तसेवा

बनावट पनीर व भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक शहरात सध्या मोठे धाडसत्र सुरू असून अन्न औषध प्रशासनही यात मागे राहिले नाही. सणावाराच्या दृष्टीने भेसळीयुक्त पदार्थांविषयी अन्न औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. अंबड येथील मे मधुर डेअरी अँड डेली निड्स या कारखान्यावर धाड टाकत रिफाईड तेलाचा वापर करून बनावट पद्धतीने पनीर तयार होत असल्याचं निदर्शनास आल्याने
आप्पासाहेब हरी घुले यांच्याकडून दोन लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई आनंद डेअरी फार्म म्हसरुळ या कारखान्यावर करण्यात आली. येथील आनंद वर्मा नामक व्यक्तीस विचारपूस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्य तेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे सांगितले. त्याठिकाणी दूध पावडर, रिफाईन पामतेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीराचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांची नमुने घेऊन त्यांचा एकूण ९ लाख ६७ हजार ३१५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही कारखाने सील करण्यात आले आहे.

The post नाशिकमध्ये बारा लाखांचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची धाड appeared first on पुढारी.