नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील पाच जणांना जन्मठेप

जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर येथील राजीव नगर झोपडपट्टीत मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने भररस्त्यात दोघांचा खुन केल्याप्रकरणी न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

रवि गौतम निकाळजे (२९), दीपक दत्ता वाव्हाळ (२५), कृष्णा दादाराम शिंदे (२५), नितीन उत्तम पंडित (२२) व आकाश उर्फ बबलू पंढरीनाथ डंबाळे (२५, सर्व रा. राजीवनगर झाेपडपट्टी, इंदिरानगर) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी दिनेश निळकंठ मिराजदार (२२, गणेशचौक) व देवीदास वसंत इघे (२२, राजीवनगर झोपडपट्टी) यांच्यावर २७ नोव्हेंबर २०१७ ला रात्री अकराच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टी परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून भररस्त्यात तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आढळून आला. हल्ल्यात दाेघांचा मृत्यू झाल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे व के. बी. चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात १९ साक्षीदार तपासले. तीन साक्षीदारांचा जबाब, मृतांच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवाल आदी आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच आरोपींनी न्यायालयात आरडाओरडा करत रडले. मात्र, पोलिस बंदोबस्त चोख असल्याने पोलिसांनी त्यांना नियंत्रणात ठेवले.

हेही वाचा : 

The post नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील पाच जणांना जन्मठेप appeared first on पुढारी.