नाशिक | धर्मांतरित आदिवासींना आरक्षण नाकारण्यासाठी घटनेत दुरुस्ती हवी : प्रकाश उईके

आदिवासी मोर्चा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आदिवासी हे हिंदूच आहेत. त्यांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा घाट काही प्रवृत्ती घालत आहेत. काही आदिवासी धर्मांतर करून आदिवासींचेही लाभ घेत आहेत आणि जो धर्म स्वीकारला आहे, त्याचाही लाभ घेताना दिसत आहेत. आरक्षण असो किंवा लाभ हा मूळ आदिवासींचा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे. हाच अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न धर्मांतरित करत आहेत. त्यामुळे राज्यघटनेतील कलम ३४२ मध्ये घटनादुरुस्तीची गरज असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे गौंड नेते तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रकाश उईके यांनी केले.

शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र यांच्या वतीने डी-लिस्टिंग महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला संबोधित करताना उईके बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रामचंद्र खराडी, राष्ट्रपती पुरस्कारविजेत्या कातकरी समाजाच्या प्रमुख ठमाताई पवार, रघुनाथ महाराज, रमणगिरी महाराज, संभाजी महाराज पारधी, महंत बाळासाहेब पारधी, सहजानंद महाराज, जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक पांडुरंग भांगरे, ॲड. गोरक्षनाथ चौधरी, ॲड. किरण गभाले आदी उपस्थित होते.

उईके यांनी आदिवासींचे प्रमाणपत्र घेऊन नोकरी तसेच इतर लाभ घेत असलेल्या धर्मांतरितांची प्रमाणपत्रे दाखवत, ते म्हणाले, अशी लाखो उदाहरणे आहेत. यामुळे मूळ आदिवासींना लाभ मिळत नाही. याला आळा घालायचा असल्यास घटनेतील ३४२ कलमामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आपल्या पाल्यांना तसेच आपल्या पुढच्या पिढीला हे लाभ मिळावे, यासाठी आताच हालचाली करणे आवश्यक आहे. आदिवासींसाठी असलेल्या लोकूर कमिटीने आदिवासींची व्याख्या दिली आहे. त्यामध्ये ज्यांची संस्कृती वेगळी आहे. ज्यांचा पेहराव, क्षेत्र हे वेगळे आहे. सरळ आणि भोळ्या स्वभावाचे लोक या सर्वांचा त्यात समावेश आहे. आदिवासी हिंदूंपासून वेगळे आहेत, असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. तो धादांत खोटा आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जानेवारीमध्ये पायी दौरा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रामचंद्र खराडे यांनी, धर्मांतरित समूह हा आदिवासींचे हक्क घेत आहे. हे सर्वात मोठे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या केंद्रात असलेल्या सरकारने आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले आहे, त्यामुळे हे सरकार आदिवासींसाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संस्कार, संस्कृती, धर्म आणि राष्ट्र या सर्व एकमेकांवर अवलंबित्व असलेल्या बाबी आहेत. यांचे असणेदेखील राष्ट्र विकसित करण्यास पुरेसे आहे आणि या सर्वांसाठी आपण बांधील आहोत असे सांगितले. तसेच ज्यांनी मेळाव्याला विरोध केला, त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत आदिवासी महिलेच्या विरोधात अर्ज केला होता, अशांना त्यांना विरोध करण्यासाठी त्यावेळी कोणीही का नव्हते, असा प्रश्न विचारला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मेळाव्यापूर्वी जनजाती सुरक्षा मंचच्या माध्यमातून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून शालिमार, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून पुन्हा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असा पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, धावपटू कविता राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

जनजाती सुरक्षा मंचचे कौतुक

आदिवासी समाजाला हक्क मिळविण्यासाठी राज्यभर मेळावे घेण्याचे काम जनजाती सुरक्षा मंच करत आहे. मेळाव्यामध्ये प्रत्येक वक्त्याने जनजाती सुरक्षा मंचचे पदाधिकारी संयोजक पांडुरंग भांगरे, सहसंयोजक ॲड. गोरक्षनाथ चौधरी, सहसंयोजक किरण गभाले यांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post नाशिक | धर्मांतरित आदिवासींना आरक्षण नाकारण्यासाठी घटनेत दुरुस्ती हवी : प्रकाश उईके appeared first on पुढारी.