नाशिक : नदीपात्रात घातकी केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला

igatpuri www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण आणि नाशिक मनपा क्षेत्रात इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातील पाणी सोडले जाते. यासाठी अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी या गावांतून जाणार्‍या ओंड ओहोळ नदीचा वापर केला जातो. मात्र या पाण्यामध्ये गोंदे, वाडीवर्‍हे भागातील कंपन्यांचे घातक केमिकल टाकले जात आहे.

गुरुवारी (दि. 18) पहाटेच्या सुमाराला अस्वली – नांदगाव बुद्रुकला जोडणार्‍या पुलावर घातक केमिकल पाण्यात ओतणारा टँकर नागरिकांनी पकडला. टँकरचालकाने नागरिकांचा रोष पाहून वाहन सोडून पलायन केले. इगतपुरी तालुक्यात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून नद्यांमध्ये घातक केमिकल ओतले जात आहे. पूर्वी मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुखजवळील पुलावर केमिकल टाकले जात होते. त्यानंतर अस्वलीजवळ ओंडओहोळ नदीच्या पुलावरून टाकायला सुरुवात झाली. या ठिकाणी लोकांना माहिती झाल्याने संबंधित कंपन्या सावध झाल्या. आता नांदगाव बुद्रुकजवळ असणार्‍या नदीपात्राच्या पुलावरून केमिकल टाकले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नाशिकचे प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे, असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी व शेतकर्‍यांच्या जमिनी नापीक करणारी ही घटना आहे. या केमिकलच्या दुष्परिणामामुळे कर्करोग, वंध्यत्व, लैंगिक समस्या, बौद्धिक दुर्बलता निर्माण होताना दिसतात. केमिकलच्या पाण्यामुळे विहिरी, हातपंप दूषित होत आहेत. मात्र यावेळी टँकरचालक केमिकल नदीपात्रात टाकत असताना नागरिकांनी डाव उधळला. संबंधित कंपनीवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नदीपात्रात घातकी केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला appeared first on पुढारी.