नाशिक : नवश्या गणपती मंदिराशेजारील दर्गा हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन

नवश्या गणपती मंदिर नाशिक,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या सभेत माहीम तसेच सांगली येथील अतिक्रमित दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करत त्याकडे सरकारचे लक्ष वेधले असतानाच, गुरुवारी सकाळी हिंदू हुंकार समितीचे हिंदूरक्षक सुरेश चव्हाणके यांनी आनंदवल्ली येथील नवशा गणपती मंदिराशेजारील दर्ग्याची पाहणी करत अतिक्रमित दर्गा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. चव्हाणके यांच्या इशाऱ्यानंतर नवश्या गणपती परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

नाशिककरांचे शेकडो वर्षांपासून श्रद्धास्थान असलेले गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरातील “नवश्या गणपती” या पेशवेकालीन गणपती मंदिराबाहेर मुस्लिम बांधवांनी उभारलेली दर्गा अनधिकृत असल्याचे चव्हाणके यांनी यावेळी सांगितले. दर्ग्याशेजारी असलेल्या रहिवासी वस्तीतील नागरिक मांसाहार करत उरलेले अन्न बाहेर टाकतात. बाहेर टाकलेले अन्न पशुपक्ष्यांच्या सहाय्याने मंदिर परिसरात पडत असल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी येथील अतिक्रमण त्वरित काढावे, अशी मागणी चव्हाणके यांनी केली आहे.

याप्रसंगी पालघर येथील हिंदू सत्यपीठाचे स्वामी भारतानंद सरस्वती, अ‍ॅड. महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, राजू, जाधव, अविनाश जाधव, बंटी जाधव, योगेश चव्हाणके, अ‍ॅड. अक्षय कलंत्री, युवराज मोरे, प्रमोद पांडे, विशाल साळवे यासह परिसरातील गणेशभक्त उपस्थित होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गंगापूर पोलिस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गणपतीसमोर घेतली शपथ

नाशिकचे इस्लामिकरण होऊ नये, महाराष्ट्राचा तसेच देशाचा गजवा हिंदू होऊ नये, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातला देश बनवावा, यासाठी आशीर्वाद घेतले असल्याचे सुरेश चव्हाणके यांनी सांगितले. 

हेही वाचा :

The post नाशिक : नवश्या गणपती मंदिराशेजारील दर्गा हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन appeared first on पुढारी.