नाशिक : नाशिकरोडला खतांच्या रेकसाठी ‘रेड सिग्नल’

रासायनिक खते कशी वापरावीत?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरिपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकातील मालधक्का येथील गोदामात रासायनिक खतांच्या साठवणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र, खतांच्या साठवणुकीसाठी असे कोणतेही धोरण नसल्याचे सांगत रेल्वेने या पत्राला केराची टोपली दाखविली. रेल्वेच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी जूनच्या प्रारंभीच जिल्ह्यात पावसाने एन्ट्री केली. पावसाच्या आगमनासोबत बळीराजाने खरिपाच्या पेरण्यांना वेगाने सुरुवात केली होती. खरिपाच्या पेरण्यांसाठी आवश्यक रासायनिक खतांचा साठा करण्यासाठी रेल्वेस्थानकातील मालधक्का येथील किमान चार गोदामे आरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी रेल्वेला दिले होते. तसे पत्र दि. २६ जून रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रबंधकांना पाठविले होते. परंतु, खते उतरवून घेण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे सांगत रेल्वेने खतांची रेक थेट मनमाड येथेच धाडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. माणसांपेक्षा सिमेंट अधिक महत्त्वाचे आहे का? तसेच पेरणी झाली, तरच अन्न मिळेल, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच दोन दिवसांत युरियाचे सहा हजार मेट्रिक टन खते येणार असल्याने त्यासाठी गोदाम आरक्षित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. परंतु, खतांसाठी गोदाम राखीव ठेवण्याची तरतूद नसल्याचे सांगत भुसावळ येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात असमर्थता दर्शविली आहे. रेल्वेच्या या मनमानी कारभारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नाशिकरोडला खतांच्या रेकसाठी ‘रेड सिग्नल’ appeared first on पुढारी.