नाशिक : निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना जामीन

सतिश खरे ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तक्रारदाराकडून तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास मुंबई उच्च न्यायालयाने पन्नास हजारांच्या जाचमुचलक्यासह सशर्त जामीन मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासात कागदपत्रांसह पुरावे संकलन व प्रतिज्ञापत्रासह इतर कार्यवाही दिरंगाई केल्याचा ठपका न्यायालयातर्फे ठेवण्यात आला आहे. खरे गेल्या ६४ दिवसांपासून तुरुंगात होते.

जिल्ह्यातील एका बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांविरोधात सहकार विभागात दावा दाखल होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात खरे यांनी १५ मे रोजी तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरे यांच्यासह खासगी वकील शैलेश साबद्रा यास रंगेहाथ पकडले. खरे यांच्या घरझडतीत ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे सोने सापडले होते. १६ लाख रुपयांची रोकड व इतर स्थावर मालमत्तेची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली होती. जिल्हा न्यायालयात खरेंचा जामीन अर्ज दोनदा नामंजूर झाला होता. त्यामुळे खरेंनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुदतीत दोषारोपपत्र दाखल न केल्याने खरे यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा :

The post नाशिक : निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना जामीन appeared first on पुढारी.