नाशिक : पळसे शिवारात वीस वर्षांपूर्वीचा दारूचा अवैद्य साठा जप्त

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा : येथील नाशिक पुणे रस्त्यावरील पळसे गावाच्या शिवारात जुन्या इंग्लिश दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला. साधारण वीस वर्षांपूर्वीचा माल असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. आजच्या बाजारभावात याचे मूल्य अंदाजे तीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शिंदे गाव येथे काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स चे गोडाऊन आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा सुरू आहे. नाशिककडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पवन चौधरी, डीबी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने गोडाऊन , गाळे, बंदिस्त घरे, जुने दुकाने यांची तपासणी सुरू केली आहे. तपासणी करताना पळसे शिवारातील फुलेनगर येथे पोलिसांना एका बंदिस्त गळ्याचा संशय आला. त्यांनी गाळा उघडल्यावर त्यामध्ये 1999 ते 2000 काळातील इंग्लिश दारूचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या सर्व दारूचा वापर करण्याची मुदत संपुष्टात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

The post नाशिक : पळसे शिवारात वीस वर्षांपूर्वीचा दारूचा अवैद्य साठा जप्त appeared first on पुढारी.