नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी

येवला

येवला : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीप्रमाणे येवल्यातील आगळावेगळा घोडेबाजार अश्वप्रेमी यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आधी मंगळवारी भरणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या घोडेबाजाराला राज्यासह देशातील विविध भागातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी येवलामध्ये पैठणी उद्योगाबरोबरीने त्यांचा पारंपरिक संरक्षण आणि घोडे खरेदी विक्रीच्या व्यवसायासाठी येवल्यात दर मंगळवारी घोडेबाजारची परंपरा सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी चालू केली होती. जुन्या काळात घोडे हेच दळणवळणाचे साधन मानले जात होते. त्या काळात येवला येथे घोड्यांचे खरेदी विक्रीचे मोठे केंद्र बनले होते. दसऱ्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी हा विशेष घोडे बाजार भरतो. या दिवशी राज्यासह देशातील अनेक व्यापारी घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. यावेळी घोड्यांच्या होगीरासह इतर सर्व सामानांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते.

पूर्वी येवला शहरात भरणारा हा बाजार 1968 च्या दरम्यान येवला बाजार समितीच्या आवारात भरला जाऊ लागला. दर मंगळवारी किरकोळ खरेदी विक्री चालू असते. मात्र, दसऱ्यात येथे लाखो रुपयांची खरेदी विक्री होते. हा घोडेबाजार नावारुपाला आणण्यात रघुजी बाबा यांचे वंशज शिंदे कुटुंबीय व अश्वप्रेमी शाहू राजे शिंदे यांचे योगदान मोठे आहे.

आमच्या पूर्वजांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी घोडे बाजाराला सुरुवात केली. शहर संस्थापक असलेले रघुजी बाबा यांनी आपण वसवलेल्या येवला शहराचे नाव पैठणी बरोबरीने देशभरात घोडेबाजारासाठीही पुढे आणले. बाजार समिती आणि आम्ही शिंदे कुटुंबीय बाजाराच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आणि विकासासाठी कार्यरत असतो. भविष्यात घोड्यांचा एक मोठा फॅशन शो घेण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
अॅड. शाहूराजे शिंदे (येवला शहर संस्थापक बाबा शिंदे यांचे वंशज)

हेही वाचा 

The post नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी appeared first on पुढारी.