भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. भगव्या पत्ताकांनी शहर भगवेमय झाले असून, शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

शिवजयंती सोमवारी (दि.१९) साजरी होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुढ्यात शिवजयंती आल्याने आयोजन-नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. शिवजयंती उत्सव समितींमार्फत यंदा विविध लक्षवेधी देखावे उभारले आहेत. त्यामध्ये अयोध्येतील राम मंदिराबरोबरच रायगड, शिवनेरी, प्रतापगडासह स्वराज्यामधील गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिवभक्तांकडून या आकर्षक देखाव्यांवर नजर हटेनाशी झाली आहे. प्रमुख चौक व रस्ते भगवे ध्वज, पताकांनी सजले आहेत.

पंचवटी शिवजन्मोत्सव समितीने अयोध्याधाममधील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मालेगाव स्टॅण्ड येथे ही गड-किल्ल्यांची प्रतिकृती उभारली आहे. तर अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारलेली ६५ फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती हा नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिवजयंतीनिमित्ताने आपले वेगळेपण जपणाऱ्या नाशिक रोडलाही भव्य अशी गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याशिवाय पंचवटी परिसर, जेलरोड, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह शहरातील अन्य उपनगरांमध्येही शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारलेली ६५ फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती. (छाया : हेमंत घोरपडे)

भगव्या ध्वजाला मागणी
शिवजयंतीनिमित्ताने भगवे ध्वजाला मागणी वाढली आहे. बाजारात ५० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत विविध आकारांतील भगवे ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवरायांची प्रतिमा, जय शिवराय, शिवमुद्रा असलेल्या ध्वजाला अधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेते सांगतात. याव्यतिरिक्त शिवाजी महाराज यांची छबी व शिवमुद्रा असलेले बिल्लेदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत असलेले हे बिल्ले खरेदीसाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे. रविवारी (दि.18) रोजी काही ठिकाणी भगवा कुर्ता किंवा भगवे वस्त्र मिळवण्यासाठी शिवभक्तांना पळापळ करावी लागली होती.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवजन्मोत्सव समितींकडून शिवकालीन मर्दानी युद्धकला व शस्त्रकला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाडे, वेशभूषा तसेच पारंपरिक न्यृत्य स्पर्धाही घेण्यात येत आहेत.

बॅनरबाजीचे फुटले पेव
२०२४ हे संपूर्णपणे निवडणुकांचे वर्ष आहे. मार्च-एप्रिलमध्ये लोकसभांचा बिगुल वाजणार आहे. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा आखाडा रंगणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. संबंधितांकडून शिवजयंतीचा मुहूर्त साधत बॅनरबाजीवर भर दिला गेला आहे. त्यामुळे गल्लोगल्ली बॅनरचे पेव फुटले आहे.

शिवजयंती 2024
नाशिक : शिवजयंतीनिमित्त भगवे ध्वज, पताका आणि स्वागत कमानींनी भगवेमय झालेले रस्ते.

The post भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले appeared first on पुढारी.