नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (शिंदे गटा)कडे असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने केलेल्या दाव्याचे राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केले आहे. नाशिक, शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. भाजपने नाशिकच्या जागेची मागणी करण्यात काही गैर नाही, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, तीनही मतदारसंघाचा दौरा करीत आहोत. नाशिक, शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. मागणी करण्यासंदर्भात काही गैर नाही. मात्र महायुतीची सत्ता आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे विखे-पाटील यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे पक्षात सुपारी बहाद्दरांना स्थान आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा तो निर्णय आहे, त्याविषयी मी फार बोलणार नाही.

बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बारामती जागा ते लढणार आहेत. बघू पुढे काय होतय ते.

जरांगेंनी आंदोलनाचा हट्ट सोडावा

मराठा आरक्षणाबाबत विचारणा केली असता विखे पाटील म्हणाले की, जो डाटा आपण गोळा केला आहे त्यानुसार आपण १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी आंदोलन मागे घेतले पाहिजे. आंदोलन करण्याचा हट्ट सोडला पाहिजे, असा सल्लाही विखे पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील appeared first on पुढारी.