नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

पांझरपोळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील सातपूर, अंबड व सिन्नर एमआयडीसीमधील बंद पडलेले उद्योग आधी सुरू करावे नंतर पांजरापोळसह नवीन जमीन अधिग्रहणाचा घाट घालावा. तब्बल 150 वर्षे जुन्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या चुंचाळे येथील 825 एकर जागेसह, सारूळ, बेळगाव ढगा येथील जागांवर संस्थेने उभारलेल्या जंगलांमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपदा नष्ट न करता शासनाच्या पडीक जमिनींवर औद्योगिक क्षेत्राचा विकास करावा, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेत मांडली.

नाशिक महानगराच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकरिता व उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी नाशिक पंचवटी पांजरापोळ संस्थेच्या चुंचाळे येथील 825 एकर जागा संपादनाविषयी अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावर नाशिकचे पदाधिकारी माजी महापौर तथा सरचिटणीस अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके आदींनी आपली भूमिका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करत पांजरापोळची जागा एमआयडीसीसाठी अधिग्रहणास विरोध दर्शविला. यावेळी अनंत (नाना) सांगळे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, धीरज भोसले, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, सचिन सिन्हा, विजय आहिरे, अक्षय खांडरे, राकेश परदेशी, अमित गांगुर्डे, संजय देवरे, अविनाश पाटील, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, किशोर वडजे, संदीप दोंदे आदी उपस्थित होते.

जागेचे संपादन होऊ देणार नाही
सातपूर व अंबड एमआयडीसीमध्ये अनेक भूखंड रिकामे आहेत. तसेच अक्राळे, सिन्नर, गोंदे येथील एमआयडीसीत हजारो एकर भूखंड रिक्त आहेत. आधी त्या ठिकाणी उद्योग उभारावेत, अशी भूमिका मनसेने व्यक्त करत बेळगाव ढगा येथील 150 एकर मोकळ्या भूखंडाकडेही मनसे पदाधिकार्‍यांनी लक्ष वेधले. नाशिकच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या पांजरापोळ येथील निसर्गसंपन्न जागेचे कोणत्याही परिस्थितीत संपादन होऊ देणार नाही, अशी ठोस भूमिका मांडताना मनसेचा विकासाला विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

The post नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध appeared first on पुढारी.