नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा

नाशिक पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरालगत असलेल्या डोंगर परिसरात वणव्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणीच्या माथ्यावर आग भडकली होती. उन्हामुळे गवत पुर्णत: वळलेले असल्याने आगीने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पथकाने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत ०.५०० हेक्टरवरील गवत जळून खाक झाले.

पंडीत जवाहरलाल नेहरू वन उद्यानाजवळील राखीव वनक्षेत्रात आग लागल्याचे धुरामुळे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच एफडीसीएम पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झोडपणीच्या (झाडांच्या फांद्या) सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. पांडवलेणीच्या माथ्यावर वाऱ्याच्या वेगामुळे आग आजूबाजूल पसरली.

एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयुर धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी दीपक बोरसे, नियत क्षेत्र अधिकारी संदीप आठरे तसेच वनसेवक भामट्या ठाकरे, मानसिंग गावित आदींनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. आगीतून डोंगरावरील मोठे वृक्ष बचावले. मात्र, ०.५०० हेक्टरवरील गवत आगीच्या भक्षस्थानी पडले. दरम्यान, वणवा पेटविणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा appeared first on पुढारी.