नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!

इगतपुरी www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या इगतपुरीतील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा आत्तापासून जाणवत आहेत. इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून फक्त तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे.

तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातूरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीवरील 200 ते 250 लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वाडीच्या परिसरातील चार-पाच विहिरींमधील पाणी रासायनिक द्रव्यामुळे दूषित झाल्या. परिणामी येथील नागरिकांना थेट दोन किलोमीटर अंतरावरील घाटनदेवी मंदिरासमोरील झर्‍यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तळेगाव डॅममधून निघणार्‍या सांडव्याच्या पाण्यात अज्ञाताने रासायनिक द्रव्य टाकले. हे द्रव्य सांडव्याद्वारे विहिरीत झिरपत असल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले. 15 दिवस उलटूनही या प्रकरणाची चौकशी झाली नाही. – तुळसाबाई मेंगाळ,
स्थानिक नागरिक.

या वाड्या नगरपरिषद हद्दीत असून अद्यापही या ठिकाणी नळकनेक्शन पोहोचलेले नाही. पूर्वी येथील नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तळेगाव डॅममधून निघणार्‍या सांडव्याचे पाणी परिसरातील विहिरीत झिरपत असल्याने या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करत. मात्र 15 दिवसांपूर्वी या सांडव्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीने रासायनिक द्रव्य टाकल्याने पाण्यावर तेलाचा तवंग तयार झाला आहे. त्यामुळे लाखो मासे व हजारो खेकडे मृत्युमुखी पडले आहेत. ज्या बाजूने हे पाणी वाहात जाते, त्या बाजूच्या शेतातील गवत आणि गावठी पालेभाज्या काळ्या पडल्या आहेत. पाण्यात रसायन कोणी टाकले याचा साधा तपासही प्रशासनाने केलेला नाही.

आमच्या वाड्या गेल्या 30 वर्षांपासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही आमच्याकडे नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीवेळी आश्वासन देतात. मात्र आजपर्यंत कोणीही त्याची पूर्तता केली नाही. – वासुदेव देवराम वाघ, स्थानिक नागरिक.

हेही वाचा:

The post नाशिक : पावसाच्या माहेरघरी... पाणीटंचाई वास करी! appeared first on पुढारी.