नाशिक : प्रकल्प संचालकांकडून गोबरधन प्रकल्पाची पाहणी, राज्यात पूर्ण झालेला पहिलाच प्रकल्प

गोबरधन प्रकल्प,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण करण्यात आलेल्या गोबरधन प्रकल्पाची पाहणी स्वच्छ भारत अभियानाचे प्रकल्प संचालक व युनिसेफच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली.

पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) चे प्रकल्प संचालक शेखर रौंदळ, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत देशपांडे यांनी सोमवारी (दि. 3) अंदरसूल येथे भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अन्सार शेख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गट समन्वयक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एका गावामध्ये गोबरधन प्रकल्प राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील अंदरसूल गावाची निवड करण्यात आली.

राज्यस्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक संस्थेकडून गावाचे सर्वेक्षण, आराखडा, अंदाजपत्रक इ. काम पूर्ण करण्यात आले. यानंतर या कामाचे ई-टेंडर करण्यात आले. त्यामध्ये पात्र ठरलेल्या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात येऊन फेब्रुवारी २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. राज्यातील पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : प्रकल्प संचालकांकडून गोबरधन प्रकल्पाची पाहणी, राज्यात पूर्ण झालेला पहिलाच प्रकल्प appeared first on पुढारी.