नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट

सिन्नर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने गारपीटीसह हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍यासह हजेरी लावलेल्या पावसाने पीकांचे मोठ्याप्रमारात नुकसान केले. द्राक्षबागांसह काढलेला कांदा या पावसात मातीमोल झाला.

सिन्नर : सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील कोनांबे, भाटवाडी, हरसुले, सोनांबे, पाडळी, टेभुरवाडी, डुबेरे, ठाणगाव तसेच पुर्व भागातील काही गावांमध्ये सुमारे अर्धा ते एक तास विजांचा कडकडाट, वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर व शेतात गारांचा ढीग साचला. शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या कांद्याभोवती पावसाचे पाणी साचल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागांत आज दुपारी 3 च्या सुमारास अर्धा ते एक तास विजेच्या कडकडासह वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी राजा शेत जमिनीमध्ये असलेल्या पिकाकडे धाव घेऊन कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होता. शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात वादळी वार्‍यासह विजेचा कडकडाट सुरू असताना पुतळेवाडी येथील महिलेचा वीज पडून मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी शनिवारी सिन्नर तालुक्यात पुन्हा अवकाळीने गारांसह धुडगूस घातल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे.

सटाणा : डांगसौंदाणेत गारपीट
बागलाण तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शनिवारी (दि. 15) सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उच्छाद मांडला. जवळपास संपूर्ण तालुकाभरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, तर डांगसौंदाणे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बागलाण तालुक्यात सलग अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍याने धुमाकूळ घातला असताना गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधानाचा सुस्कारा सोडून कांदा काढणीला सुरुवात केली होती. परंतु शेतकरी वर्गाचा पुन्हा भ्रमनिरास झाला आणि शनिवारी (दि. 15) 5 च्या सुमारास संपूर्ण तालुकाभरातच पावसाने हजेरी लावत सगळ्यांचीच दाणाफाण उडवून दिली. डांगसौंदाणे परिसरात पुन्हा एकदा जोरदार गारपीट झाली. त्यामुळे परिसरातील होती नव्हती ती सगळी पिके हातातून गेली आहेत. उन्हाळ कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या तालुक्यात यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा उत्पादनाचे प्रचंड नुकसान केले आहे. सोबतच द्राक्ष, डाळींब, भाजीपाला, टरबूज, खरबूज, काकडी व अन्य पिकांचे मातेरे केले आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, तोच पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

देवळ्यातही अवकाळीची हजेरी
शनिवारी सायंकाळी तालुक्यात वादळी वार्‍यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळ कांद्याचे नुकसान होणार आहे. शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा व ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वार्‍यासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे कांद्यासह अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

अवकाळी पाऊस www.pudhari.news
नाशिक : अवकाळीमुळे झालेला गारपिटीचा ढीग. तर दुस-या छायाचित्रात गारपीटीचा ढिग बाजूला करताना शेतकरी.

दिंडोरीही गारपीटीचा तडाखा
अगोदरच द्राक्षपिकाला भाव नसल्याने हवालदिल झालेल्या द्राक्ष उत्पादकांना आज झालेल्या गारपिटीने मोठे नुकसान करत अडचणीत आणले असून द्राक्षपिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका मोहाडी, खडकसुकेणे, कुर्णोली परिसराला बसला. शनिवारी (दि. 15) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसासह गारपिटीने शेतपिकांना मोठा फटका बसला. मोहाडी, खडकसुकेणे, कुर्णोली, चिंचखेड, परमोरी म्हेळुस्के आदी गावांमध्ये गारपीट झाली, तर अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने कहर केला. अवकाळीने द्राक्षशेतीसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहाडी, खडकसुकेणे, कोराटे व कुर्णोली परिसरात 5 च्या सुमारास एक तास तुफान गारपीट झाल्याने द्राक्षबागांमध्ये गारांसह द्राक्षाचा खच साचला होता. या परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असून अजूनही अनेक द्राक्षबाग काढणे बाकी आहे. द्राक्षबागांसह कांदा, भाजीपाला, गहू यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाने भरीव नुकसानभरपाई द्यावी, कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

चांदवडला पुन्हा अवकाळीची हजेरी : तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाची हजेरी लावली. यामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, कांदा बियाणे (डोंगळा) आदींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसाने उघड्यावर असलेले कांदा पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांची समाधान व्यक्त केले.

नाशिक www.pudhari.news
नाशिक : शहरात झालेल्या वादळी पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. त्यातून प्रवास करताना वाहनधारकांची अशी तारांबळ उडत होती. (छाया : हेमंत घोरपडे)

शहरात मुसळधार वादळी पावसाने वृक्ष कोसळले  : शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि. 15) मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील पाच मोठे वृक्ष कोसळले. वृक्ष कोसळल्याने परिसरात वीज खंडित, वाहतूक कोंडी व इतर नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसात सातपूर, नाशिकरोड, पारिजातनगर, बारदान फाटा व पाथर्डी फाटा परिसरात प्रत्येकी 1-1 वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर इतर 4 ते 5 ठिकाणी छोटे वृक्ष किंवा वृक्षांच्या फांद्या कोसळल्याचेही समोर आले आहे.

The post नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट appeared first on पुढारी.