नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

बाजारी समिती www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. निवडणुकीच्या रचनेसाठी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसची बैठक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. उमेदवार कोणीही असला तरी पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे अवाहन माजी आ. भालेराव यांनी केले.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तनमनधनाने कामाला लागा. उमेदवारांची योग्य निवड केली जाईल. ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याने लगेच खचून न जाता पक्षासोबत शेवटपर्यंत राहावे. त्यांचा योग्य ठिकाणी विचार केला जाईल. निवडणूक स्वबळावर लढवायची की मित्रपक्षांसोबत हे लवकरच सर्वांना सांगितले जाईल, असे भालेराव यांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. गायकवाड यांनी बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी की, स्वबळावर याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, पक्षाचा जो निर्णय असेल तो मान्य करून राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे अवाहन केले. बैठकीला विजय जाधव, खंडेराव आहेर, शहाजी भोकनळ, अनिल काळे, आर. डी. थोरात, विजय गांगुर्डे, रमाकांत शिंदे, वसंत पगार, राजाराम पगारे, अनिल पाटील, शैलेश ठाकरे, दत्तात्रय वाघचौरे, सतीश सोनवणे, भगवान खताळ, रघुनाथ आहेर, सुखदेव जाधव, अरुण न्याहारकर, प्रकाश शेळके, निवृत्ती घाटे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. श्याम जाधव, मधुकर टोपे, बाजीराव पगार, शांताराम चव्हाण, भूषण शेळके, बाळासाहेब कासव, बाबूराव गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ appeared first on पुढारी.