नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर

नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात पहिली नवी कोरी ३४ आसनी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. नाशिक ते बोरिवली मार्गावर ही बस धावणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुखकर होणार आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीने पुनरुज्जीवन आराखड्यांतर्गत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसची खरेदी केली जात आहे. सर्वप्रथम ताफ्यात ई-शिवाई बसेस दाखल केल्यानंतर एसटी प्रशासनाने आता ३४ आसनी ९ मीटरच्या छोट्या बसेसदेखील टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल करायला सुरुवात केली आहे.

एसटीच्या नाशिक विभागामध्ये पहिली नऊ मीटरची बस दाखल झाली आहे. ही नवीन बस नाशिक ते बोरीवली या मार्गावर सोडण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतुकीची समस्या व मोठ्या आकाराच्या बसेसमुळे प्रवासाला अधिक काळ व्यतित होता. त्याउलट नवीन प्रकारच्या पर्यावरणपूरक नऊ मीटर बसगाड्यांमुळे प्रवास जलद व अधिक सुखकर होण्यास मदत होईल. येत्या काळात टप्प्याटप्प्याने अशाच १० बसेस नाशिकमध्ये दाखल होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

दोन तासांमध्ये चार्जिंग

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण पाच हजार १५० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. त्यामध्ये १२ मीटरच्या दोन हजार ८०० तसेच नऊ मीटरच्या २३५० बसेसचा समावेश आहे. 100 टक्के इलेक्ट्रिक असलेल्या या बसच्या चार्जिंगसाठी साधारणत: दोन तासांचा कालावधी लागणार आहे. बस एकदा फुल्ल चार्जिंग केल्यानंतर 200 किलोमीटरचा पल्ला ती गाठेल.

The post नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर appeared first on पुढारी.