नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
भीषण दुष्काळासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 22 एप्रिल 1973 रोजी सिन्नर शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मोर्चा सिन्नर तहसील कार्यालयावर निघाला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने 5 हुतात्मे शहीद झाले होते. या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

भीषण दुष्काळात हाताला काम, खायला धान्य व प्यायला पाणी मिळावे यासाठी माजी आमदार कै. सूर्यभान गडाख, कै. शंकरराव बाळाजी वाजे, कै. काशिनाथमामा गोळेसर यांच्यासह नेत्यांच्या नेतृत्वाखाली 22 एप्रिल 1973 रोजी सिन्नर शहरात ऐतिहासिक मोर्चा निघाला होता. दुपारी 12 च्या दरम्यान मोर्चा नगर परिषदेच्या दवाखान्याजवळ आला असताना समाजकंटकांनी मोर्चावर दगडफेक केली. मोर्चास हिंसक वळण लागले व पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पाच मोर्चेकरी शहीद झाले. ज्ञानेश्वर विठाबा साठे, अशोक रामभाऊ पगार, चिंतामण रामचंद्र क्षत्रिय, गणपत गंगाधर वासुदेव, अशोक गणपत कवाडे शहीद झाले. संतप्त मोर्चेकर्‍यांनी न्यायालयाच्या इमारतीला आग लावली होती. त्यात अनेक खटल्यांची कागदपत्रे जळून खाक झाली. या घटनेमुळे तालुक्यातील दुष्काळाकडे देशाचे लक्ष वेधले गेले. या घटनेमुळे देशात सिन्नर तालुक्यात प्रथमच रोजगार हमीची मुहूर्तमेढ झाली. त्यानंतरच्या काळात दुष्काळ हटविण्यासाठी विविध योजना राबविल्या गेल्या. हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नगर परिषदेसमोरील चौकात स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी स्मृतिस्तंभावर स्मारक समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येते. आमदार माणिकराव कोकाटे यांनी नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उभारणीवेळी हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण केले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकारातून नगर परिषदेने 12 वाजता भोंगा वाजवून हुतात्म्यांच्या स्मृति जागविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

मोर्चानंतर काय घडले…
संतप्त जमावाकडून न्यायालय इमारतीला आग
अनेक खटल्यांची कागदपत्रे खाक
रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ
हुतात्म्यांच्या स्मृतीत उभारला स्मृतिस्तंभ

शासनाच्या दप्तरी नोंद नसल्याची खंत
50 वर्षांत अशी ऐतिहासिक घटना पुन्हा घडली नाही, असे असतानाही या घटनेची नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, सिन्नर सहकारी वाचनालय आदी कार्यालयांच्या दप्तरी नोंद नसल्याबद्दल हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रम
स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि.22) दुपारी 12 वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराथी यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद appeared first on पुढारी.