नाशिक : भुयारी मार्ग बनलाय गर्दुल्ल्यांचा अड्डा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

आडगाव नाक्याकडून द्वारकाकडे जाणाऱ्या महामार्गावरील पंचवटी महाविद्यालयासमोर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गामध्ये टवाळखोरांचा वावर वाढला असून, हा मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. या मार्गामध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून, टवाळखोर सर्रासपणे प्रातर्विधी करत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

महाविद्यालयीन युवक-युवतींसह आजूबाजूच्या नागरिकांना महामार्ग ओलांडून जाणे धोक्याचे ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पंचवटी महाविद्यालयासमोर लाखो रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व स्थानिक नागरिकांचा रस्ता ओलांडण्याचा धोका टळल्याने सर्वांनीच प्रशासनाचे स्वागत केले. सुरूवातीला या भुयारी मार्गाचा चांगल्याप्रकारे वापर होत हाेता. मात्र प्रशासनाने येथील सुरक्षाव्यवस्थेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अलीकडे या भुयारी मार्गाचा ताबा टवाळखोर आणि गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना या मार्गाचा वापर करताना अडचणी येऊ लागल्या आहे. विशेषत: मुली वा महिलांना जीव मुठीत धरुनच येथून मार्गक्रमण करावे लागत आहे. टवाळखोर सर्रासपणे येथे प्रातर्विधी करत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे. येथून नाकाला रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. भुयारी मार्गाच्या पायऱ्या आणि भिंतींवर गुटखा व तंबाखूच्या पिचकाऱ्यांची रंगरंगोटी पहायला मिळते. भुयारी मार्गाला सुरूवातीला असलेल्या लोखंडी ग्रिल व रॉड भुरट्या चोरांनी डल्ला मारल्याचे दिसून येते. भुयारी मार्गातील विद्युत दिवे फोडण्यात आल्याने सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असल्याने येथून मार्गक्रमण करणे गैरसोयीचे ठरत आहे.

पंचवटी महाविद्यालयाकडून स्वच्छता मोहीम

पंचवटी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसाेय लक्षात घेऊन अनेकदा याठिकाणी विद्युत दिवे बसविले आहेत. मात्र टवाळखोर दगड मारून हे दिवे फोडून टाकत असल्याचे सांगितले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या वतीने भुयारी मार्गामध्ये नियमित स्वच्छता मोहीमही राबविली जाते. परंतु टवाळखोर आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने भुयारी मार्गात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत आहे.

स्वच्छता अन‌् सुरक्षाव्यवस्था गरजेची

सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासनाचे भुयारी मार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मनपाने येथे नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असून, भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी ग्रील बसवून त्याला कुलुपाची व्यवस्था करावी. तसेच, सुरक्षारक्षकाची नेमणूक अथवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीही मागणी केली जात आहे. पोलिस प्रशासनाने सकाळ सायंकाळ गस्त घालण्याचीही मागणी पुढे आली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : भुयारी मार्ग बनलाय गर्दुल्ल्यांचा अड्डा appeared first on पुढारी.