नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल

शुभांगी पाटील, सत्यजीत तांबे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर, आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये पाचही विभागापैकी नाशिक पदवीधर निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे सर्वांधिक लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस बघायला मिळणार आहे.

कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावर कॉंग्रेसने तांबे-पितापुत्राचे निलंबन केले. त्यामुळे कॉंग्रेससोबत दुरावा निर्माण करुन भाजप सोबत जवळीक साधलेले सत्यजीत तांबे व दुसरीकडे शुभांगी पाटील या भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक सर्वांधिक चर्चेत राहीली.

दरम्यान शुभांगी पाटील यांनी निवडणूक निकालाआधीच विजयाचा दावा केला आहे. पदवीधर मतदारांचा कौल हा माझ्याच बाजुने होता. जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. कुणी काहीही म्हटलं तरी विजय निश्चित असल्याचा दावा स्वत: उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी केला आहे.

मतदान किती झाले आहे, याचा पूर्ण अहवाल माझ्याकडे आहे. प्रचारादरम्यान जनतेनं खूप प्रेम दिलं. एखाद्या मंत्र्याच्या पोरीला देखील इतकं प्रेम मिळणार नाही तितकं प्रेम जनतेनं मला दिलं. जनता मला भेटण्यासाठी रस्त्यावर येत होती. मला कुणी चणे देत होते, कुणी फुटाणे, तू पुढे चालत रहा थांबू नको असा आत्मविश्वास मला जनतेनं दिला. त्यामुळे हा विजय जनतेचा असेल असे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल appeared first on पुढारी.