नाशिक मधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित, प्रशासनाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) आयोजित केलेला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम स्थगित केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे राज्यातील राजकीय घडामोडींची किनार असल्याचे समजते.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी ७ ते ८ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी (दि. ८) नाशिकमध्ये त्याचे आयोजन केले होते. त्यादृष्टीने पालकमंत्री दादा भुसे यांनी दि. ३० जून रोजी बैठक घेत कार्यक्रमाच्या तयारीचे सूक्ष्म नियोजन केले होते. बैठकीत लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यापासून ते जेवणावळी, कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिर व रोजगार मेळावा, विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स आदी विषयांवर बारकाईने चर्चा केली. तसेच पावसाचे दिवस बघता १ लाख नागरिक बसतील, अशा पद्धतीने वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने जय्यत तयारीही सुरू केली होती. परंतु, प्रशासनाकडून मंगळवारी (दि. ४) हा कार्यक्रम स्थगित केल्याचा संदेश देण्यात आला. त्यामुळे साऱ्याच यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहेत. दुसरीकडे धुळ्यात सोमवारी (दि. १०) ‘शासन आपल्या दारी’ हा नियोजित कार्यक्रम पार पडणार आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित करण्यामागे प्रशासनाकडून ठोस कारण दिले गेले नसले, तरी त्यामागे दोन दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाची किनार आहे. नाशिकचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ हे सत्तेत सहभागी झाल्याने कार्यक्रमाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. त्यानुसार कार्यक्रम पत्रिकेपासून ते व्यासपीठावरील बैठक व्यवस्था तसेच अन्य बाबींची नव्याने आखणी करावी लागणार आहे. तयारीसाठी काही अवधी देणे आवश्यक असल्याने तूर्तास कार्यक्रम स्थगित करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक मधील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम स्थगित, प्रशासनाची माहिती appeared first on पुढारी.