नाशिक : मनपाचा नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेने विविध संवर्गनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला असून, दिवाळीपूर्वी हा आकृतिबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीस्तव सादर केला जाणार आहे. दरम्यान, या आराखड्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या दालनात गुरुवारी(दि.२६) सकाळी ११ वाजता खातेप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली आहे.

७ नोव्हेंबर १९८२ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानुसार विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ७,०९२ पदांना मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान गेल्या २४ वर्षांत नोकरभरती झाली नाही. नियत वयोमानानुसार दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांमुळे रिक्तपदांचा आकडा तीन हजारांपर्यंत पोहोचला आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सेवा सुविधा पुरविताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची दमछाक होत आहे. महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली. मात्र नोकरभरती झाली नाही. २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र या आकृतिबंधातील त्रुटींकडे लक्ष वेधत फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. शासनाच्या नगरविकास विभागाने १६ एप्रिल २०२१ रोजी आदेश जारी करत महापालिकेतील ६०५ नवीन पदांना मान्यता दिली होती. मात्र, आस्थापना खर्च ३५ टक्क्यांवर गेल्याने महापालिकेला या पदासाठी नोकरभरती करता आली नाही. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदभरतीचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने महापालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेणे व त्यानंतर नोकरभरती करण्यासाठी धडपड सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या ४९ विभागांकडून आवश्यक पदे, मंजूर पदे व नवीन निर्मितीसाठी पात्र पदांचे अहवाल मागवले. आता हे अहवाल एकत्र करून कोणती पदे भरणे आवश्यक आहेत, कोणती पदे कालबाह्य ठरल्याने रद्द करणे आवश्यक आहे, यासंदर्भातील शिफारस केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत अंतिम निर्णय घेऊन आयुक्तांमार्फत राज्याच्या नगरविकास खात्याला दिवाळीपूर्वी आराखडा पाठवणार आहे.

मुख्य अभियंतापद निर्मितीच्या हालचाली

महापालिकेत सद्यस्थितीत शहर अभियंता हे प्रमुख पद असले तरी आता मुख्य अभियंता पदनिर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनाच या पदावर पदोन्नती देण्याच्या हालचाली आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला पीएच.डी.चा तत्सम अभ्यासक्रमही वंजारी यांनी आयआयटी पवईमार्फत पूर्ण केल्याचे समजते. वंजारी हे नियत वयोमानानुसार येत्या मे महिन्यात सेवानिवृत्त होत असले तरी नवीन पात्रतेमुळे त्यांना दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार नवीन आकृतिबंध तत्काळ सादर केला जाणार असून, त्यात कोणती पदे अंतिम करायची याचा निर्णय घेण्यासाठी आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.

– लक्ष्मीकांत साताळकर, उपआयुक्त, प्रशासन

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाचा नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध appeared first on पुढारी.