मालेगावातील तरुणाई कुत्तागोलीच्या विळख्यात

कुत्तागोलीची नशा,www.pudhari.news

मालेगाव मध्य : सादिक शेख

नाशिक येथे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी छापा टाकून ड्रग्जबाबत मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर येथे पोलिस तपासात कुत्तागोली (अल्प्रलोजोम) चा नशेसाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. मालेगाव शहरातील तरुणाई आधीच या कुत्तागोलीच्या विळख्यात सापडली असताना आता पुन्हा कुत्तागोलीचा विषय ऐरणीवर आला आहे. मालेगावातील कुत्तागोलीचे कनेक्शन थेट परराज्याशी असल्याने पोलिस प्रशासनाला यास पायबंद घालण्याचे मोठे आव्हान आहे. नशेच्या आहारी जाणार्‍या तरुणांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिस प्रशासनासोबतच समाजातील जबाबदार घटकांनादेखील पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील नेहरू चौकात आझादनगर पोलिसांनी छापा टाकून या गोळ्यांचा साठा जप्त केला. कुत्तागोलीचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. नशेसाठी वापर केली जाणारी कुत्तागोली शहरात येतेच कशी याबाबतचा कसून तपास केल्यावर देशातील दोन राज्यांचे कनेक्शन असल्याचा पोलिस प्रशासनाला संशय आहे. यापूर्वी मालेगावी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी तपास केला असता मध्य प्रदेश, गुजरात तसेच भिवंडी परिसरातून या गोळ्या आणल्या जातात. काही जणांनी हरियाणामधूनदेखील गोळ्या आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान नाशिक जिल्ह्यात कुत्तागोलीची सर्वात जास्त विक्री मालेगावमध्ये होत असल्याचे दिसून येते. या गोळीला पायबंद घालण्यासाठी मालेगाव शहरातील औषधविक्रेत्यांवर आता पोलिसांची नजर आहे.

मालेगावमध्ये कुत्तागोलीचे ठिकठिकाणी एजंट असून, हे एजंट मध्य प्रदेश आणि गुजरातमधून या गोळ्या मिळवतात. गेल्या काही वर्षांपासून मालेगाव शहरामध्ये कुत्तागोलीची नशा करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईदेखील केली जात आहे. परंतु या गोळीचे रॅकेट पूर्णत: उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. अवघ्या दोन-पाच रुपयांना मिळणाऱ्या या गोळीचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर वाढत असून, मालेगावातील तरुणाई कुत्तागोलीच्या विळख्यात अडकत चालल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होणार आहे.

माहितीसाठी हेल्पलाइन

तरुणांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी व्यापक स्तरावरपर्यंत प्रयत्न होण्याची गरज असून, काही मुस्लीम संघटना आणि पोलिस दलाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याशिवाय ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या 6262256363 या हेल्पलाइन नंबरवर अवैध प्रकारचे व्यवसाय केले जात असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही जाहीर केले आहे. त्यामुळे अवैध धंद्याच्या पाठोपाठ कुत्तागोलीच्या संदर्भातही कारवाई केली जाणार आहे.

काय आहे कुत्तागोली?

गोळीचे मूळ नाव ‘अल्प्रलोजोम’ आहे. काही उत्तेजक पदार्थांपासून गोळीची निर्मिती होते. मानसिक आजार व झोप न येणे या रुग्णांसाठी अल्प्रालोजोम ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्पप्रमाणात देण्यात येते. मात्र या गोळीचा वापर नशेसाठी होत आहे. या गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. मेंदूवर परिणाम करणार्‍या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. आपण काय करतोय, याचे भानही या तरुणांना राहत नाही. मात्र, यामुळे अनेक तरुण गुन्हेगारी कृत्यांकडे वळत आहेत. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्स या गोळ्या सर्रासपणे ही गोळी विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.

यंदा २४ गुन्हे दाखल

मालेगाव शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत सन 2022-2023 सप्टेंबर अखेर 24 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 46 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख 82 हजार 967 रुपयांची एमडी पावडर व गुंगीकारक गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

The post मालेगावातील तरुणाई कुत्तागोलीच्या विळख्यात appeared first on पुढारी.