नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक

फाईल्स,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या फायलींमधील माहिती काही कर्मचार्‍यांकडून संबंधित ठेकेदारांना दिली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. बहुतांश फायलींचा प्रवास हा कर्मचार्‍यांच्या हातून होत असतो. त्यामुळे ही माहिती लीक होत असल्याने अनेक महत्त्वाची व गोपनीय माहिती मनपाबाहेर जात असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयीच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

या प्रकारामुळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त (सेवा) अशोक आत्राम यांनी पत्र काढत संबंधित कर्मचार्‍यांना तंबीच देऊ केली आहे. कार्यालयीन कामकाजाबाबतची माहिती बाहेर उघड केल्यास संबंधित कर्मचारी तसेच खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आत्राम यांनी दिला आहे. महापालिकेतील विविध विभागांत अनेक विकासकामे तसेच ठेक्यांशी संबंधित कामकाजाचे प्रस्ताव तसेच संबंधित कागदपत्रांच्या फाइल्स असतात. त्यावर संबंधित खात्याचे लिपिक, अधीक्षक, खातेप्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून टिप्पणी लिहिल्या जातात. तसेच विकासकामांबाबतचे प्राकलन व व्यवहार्यता तपासणीकरिता प्रस्ताव लेखा व वित्त विभाग, लेखापरीक्षण अशा विविध ठिकाणी त्या फायलींचा प्रवास होत असतो. या प्रवासादरम्यानच आपले इप्सित साध्य करण्याकरता काही कर्मचारी व अधिकारी थेट संबंधित कामाच्या ठेकेदारांशी संपर्क साधून फाइलमधील टिप्पणीची माहिती देत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे खातेप्रमुखांकडून तसेच अतिरिक्त आयुक्तांकडून करण्यात आलेली टिप्पणी बाहेर जात असल्याने मनपाच्या कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आत्राम यांनी पत्र काढत माहिती लीक केल्याचे आढळून आल्यास कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नस्तींवरून वरिष्ठ अधिकार्‍यांत वाद

अतिरिक्त आयुक्त आत्राम यांच्या अधिनस्त असलेल्या विभागामार्फत सादर करण्यात येणारे प्रस्ताव, विकासकामांच्या फाइल या परस्पर थेट आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे पाठविल्या जातात. त्यामुळे या बाबींवरही आत्राम यांनी आक्षेप घेतला असून, आयुक्तांनी दिलेले आदेश सर्वांना बंधनकारक आहे. परंतु, कार्यालयीन शिस्त व अतिरिक्त आयुक्तांना त्याबाबतची माहिती असणे आवश्यक असल्याने संबंधित खातेप्रमुखांनी यापुढे आपल्या विभागाच्या अखत्यारितील सर्व प्रकारच्या नस्ती या अतिरिक्त आयुक्तांमार्फतच आयुक्तांकडे पाठविण्याची दक्षता घेण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त आत्राम यांनी विभागप्रमुखांना केली आहे. या पत्रप्रपंचामुळे एक प्रकारे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्यातील संबंध बिनसलेले असल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक appeared first on पुढारी.