नाशिक मनपा : फेब्रुवारीत पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कोरोनामुळे खंडित झालेली महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाच्या आयोजनाची परंपरा गेल्या वर्षीपासून पूर्ववत सुरू झाली. आता येत्या फेब्रुवारीतही महापालिका मुख्यालय पुष्पोत्सवाने बहरणार आहे. उद्यान विभागाने पुष्पोत्सवाच्या आयोजनाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. यंदा शहरातील बांधकाम व्यावसायिक व डेकोरेटर्सनादेखील या उत्सवात सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश शहरभर पोहोचविण्यासाठी तसेच नाशिककरांमध्ये फळाफुलांविषयी आवड निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने प्रथम महापौर स्व. शांताराम वावरे यांनी १९९३ मध्ये महापालिकेच्या वतीने पुष्पोत्सवाच्या आयोजनाची परंपरा सुरू केली होती. २००८पर्यंत ही परंपरा काही अपवाद वगळता अखंडितपणे सुरू होती. परंतु, २००८ मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागात उघडकीस आलेला कोटेशन घोटाळा आणि त्यात तत्कालीन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंड पावली. त्यानंतर २०१८मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी केली होती. परंतु त्याआधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ आयुक्तपदी विराजमान झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करत पुष्पोत्सवाच्या आयोजनाला ब्रेक लावला होता. परंतु मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेत फेब्रुवारी २०१९ मध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन करीत पुन्हा या परंपरेला चालना दिली. तत्कालीन उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी आयुक्त गमे यांची योजना मूर्त स्वरूपात उतरवली. २०२० मध्येदेखील ही परंपरा कायम राखली गेली. मात्र, कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पुष्पोत्सवाच्या आयोजनावर निर्बंध होते. या महामारीचे संकट दूर झाल्यानंतर गेल्यावर्षी उद्यान विभागाने पुष्पोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेला पुष्पोत्सवाचे वेध लागले आहेत. पुष्पोत्सवाच्या तयारीला उद्यान विभागाने आतापासूनच सुरुवात केली आहे.

तीनदिवसीय महोत्सव

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात तीनदिवसीय पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात असते. या कार्यक्रमात विविध प्रकारची गुलाबपुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनीएअचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यात प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात येतात. गुलाबराजा व गुलाबराणी या मानाच्या पारितोषिकाकडे सर्वांचे लक्ष असते. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही दिली जाते.

हेही वाचा :

The post नाशिक मनपा : फेब्रुवारीत पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका appeared first on पुढारी.