जिद्द मनाची आवड वर्दीची, पहिल्याच प्रयत्नात श्रेया नौदलात भरती

नौदलात भरती,www.pudhari.news

चांदवड : सुनील थोरे

लहानपणापासून देशसेवेची आवड असलेली अन् एक ना एक दिवस सैनिकाची वर्दी अंगावर घालण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या श्रेया ठाकरेने जिद्द, चिकाटी अन मेहनतीच्या जोरावर रात्र अन् दिवस अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या या जिद्दीला अन् चिकाटीला तिच्या घरच्यांनी, नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी सलाम केला आहे.

श्रेयाने हिने ओडिशा येथील नौदलातील आयएनएस चिल्का येथे आपले खडतर ट्रेनिंग पूर्ण करून एअर इंजिनिअर पदावर कार्यरत झाली. श्रेयाचे प्राथमिक शिक्षण सोनीसांगवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, तर उच्च शिक्षण नाशिक येथिल भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पूर्ण केले. तिचे आजोबा रामचंद्र ठाकरे हे मविप्रमधील निवृत्त कर्मचारी असल्याने खरे उमेदीचे मार्गदर्शन श्रेयाला आजोबांचे मिळाले. वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. तर आई मविप्रमध्येच प्राथमिक शिक्षिका आहे.

श्रेयाचे देशसेवा करणे हेच ध्येय होते आणि ध्येयप्राप्तीसाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. दरम्यानच्या काळात नौदलात जागा निघाल्या. त्यामध्ये तिने अर्ज भरला. या पदासाठी आवश्‍यक असलेली शारीरिक व लेखी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. निवड यादीत तिचे नाव पाहिल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेना. विविध संस्थानी व मिलिटरी महाविद्यालयाने तिचा सत्कार केला. दरम्यान, तिने चिल्का येथे प्रशिक्षण पूर्ण केले असून, एअर इंजिनिअर पदासाठी केरळ राज्यातील कोची येथे तिची नेमणूक झाली आहे. नौदलाच्या गणवेशात श्रेया घरी आली असता समस्त गावकरी, नातेवाईक मित्रपरिवाराने तिचे फटाके वाजवून व फुलांची उधळण करीत स्वागत केले. नौदलाच्या गणवेशात पोटच्या मुलीला पाहिल्यावर आई, वडिलांचे डोळे पाणावले होते. श्रेयाच्या यशात तिच्या आई-वडिलांचे व कुटुंबातील सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

हेही वाचा :

The post जिद्द मनाची आवड वर्दीची, पहिल्याच प्रयत्नात श्रेया नौदलात भरती appeared first on पुढारी.