Nashik : रस्ता चोरीची खोटी तक्रार भोवणार, सरपंचावर होणार कारवाई

रस्ता हरवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला प्राप्त होत होत्या. इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील सरपंचांनी त्यांच्या गावातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नेमलेल्या पथकाने तपास करत तक्रारीत तथ्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जि. प. सिईओ मित्तल यांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तक्रारदार सरपंच यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत कारवाईची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत अशा खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून बांधलेले रस्ते चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांत समोर आला होता. गेल्या महिन्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे रस्त्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास पूर्ण करून अहवाल प्राप्त झाला. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील सरपंचांनीच रस्ता चोरीस गेल्याची तक्रार केली होती.

याबाबत जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी याबाबत पथक नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता संदीप सोनवने यांनी पेठ उपअभियंता भडांगे, शाखा अभियंता मोरे आणि सहाणे यांचे पथक नेमले. पथकाने जागेवर तक्रारदारांना समोर ठेउन पाहणी केली. या पाहणीमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने रस्ता खोदून तपासणी केली. त्यात रस्त्याची लांबी, रुंदी व खोली तपासली असता काम १०० टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्याचे फोटो देखिल काढले. शिवाय तक्रारदार सरपंच यांना रस्ता दाखवत त्यांच्या तक्रारीचे निरसन केले. उपसरपंचांनी रस्ता झाला असल्याचे लेखी दिले. त्यानंतर रस्ता चोरीला गेला नसल्याचा अहवाल सादर केला.

अहवालानुसार, जिल्हा परिषदेची बदनामी करण्याच्या हेतूने कुऱ्हेगावच्या सरपंच संगीता धोंगडे व पदाधिकारी भाऊसाहेब धोंगडे यांनी तक्रार केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik : रस्ता चोरीची खोटी तक्रार भोवणार, सरपंचावर होणार कारवाई appeared first on पुढारी.