नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त

कुणबी जात प्रमाणपत्र नोंदी शोध,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शासनाच्या निर्देशांनंतर मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सुमारे पाचशे शिक्षक कामाला लागले आहेत. सुमारे एक लाख अठरा हजार दाखल्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून ४७६ कुणबी नोंदी प्राप्त झाल्या आहेत.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शासनाने कुणबी दाखल्यांचा शोध घेऊन आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी शासनाला दोन जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला कुणबी दाखल्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर समिती स्थापण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये महपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले तपासले जात आहेत. १९६७ पूर्वीचे, १८९७ ते १९२९ या कालावधीतील एकूण एक लाख १८ हजार ४५४ दाखले तपासण्यात आले. त्यात फक्त कुणबी नोंद असलेले ४६१, तर मराठा कुणबी नोंद असलेले ११ व कुणबी मराठा नोंद असलेल्या पाच नोंदी प्राप्त झाल्या. १९६७ पर्यंतचे दाखले शोधायचे आहे. ३८ वर्षांचे दाखले तपासण्याचे काम ४५० शिक्षक करत आहेत. सातपूर, भद्रकालीतील रंगारवाडा, पंचवटी या भागात जुने दफ्तर शोधण्याची मोहीम सुरू आहे.

आत्तापर्यंत १९२९ पर्यंतचे दाखले तपासले असून, त्यातून काही आकडेवारी समोर आली आहे. उर्वरित दाखले तपासणीचे काम लवकरच पूर्ण होईल. महापालिकेचे जवळपास ४५० ते ५०० शिक्षक काम करत आहेत.

– बी. टी. पाटील, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त appeared first on पुढारी.