नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशकात डेंग्यू (Dengue in nashik) साथीचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या ८०४वर गेल्याने आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साथरोग मृत्यू संशोधन समितीच्या बैठकीत डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची कानउघाडणी करण्यात आली आहे. विशेषत: नाशिकरोडमधील डेंग्यू बळीची समितीने गंभीर दखल घेत डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूचा प्रकोप मात्र मोठ्याप्रमाणावर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल १९३ डेंग्यू बाधितांची नोंद झाली. नाशिकरोड येथील आनंदनगर परिसरातील एका व्यावसायिकाचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या रक्ननमूने तपासणीचा अहवाल डेंग्यू पॉझिटीव्ह आला आहे. उर्वरित दोघा संशयितांचे मृत्यू अन्य कारणामुळे झाल्याचे निदान झाले आहे. शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कपील आहेर यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग मृत्यु संशोधन समितीची बैठक जिल्हा रुग्णालयात पार पडली. यात महापालिकेची कानउघाडणी करत, डेंग्यूच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात खासगी रुग्णालयांत होणाऱ्या डेंग्यू संशयीतांची माहिती दररोज अपडेट करण्यासह शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असलेल्या परिसरात धूर फवारणी वाढवणे, गप्पी मासे सोडणे, तसेच घरांची तपासणी वाढविण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. या बैठकीला सहाय्यक उपसंचालक, सहाय्यक संचालक विवेक खतगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी चव्हाण, मलेरिया विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके उपस्थित होते. (Dengue in nashik)

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८९ नवे रुग्ण (Dengue in nashik)

जुलै अखेरपर्यंत शहरात अवघे १४४ डेंग्यू रुग्ण होते. ऑगस्टपासून डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढून डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची विक्रमी लागण होऊन २६१ जण पॉझिटिव्ह आढळले. ऑक्टोबर मध्ये १९३ रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात ८९ डेंग्यूबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता ८०४वर पोहोचला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.