नाशिक : महाथकबाकीदारांकडे घरपट्टीचे 50 कोटी

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या विविध कर आकारणी विभागाने शहरातील 1,258 इतक्या घरपट्टी महाथकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यांच्याकडे 49 कोटी 84 लाख 65 हजार रुपयांच्या थकबाकीचे खोके येणे बाकी आहे. थकबाकीत सर्वाधिक 20 कोटी 55 लाखांचा थकीत कर पूर्व विभागात, तर पंचवटी विभागाकडे 69 लाख 73 हजार इतका सर्वांत कमी कर थकीत आहे. सोमवारी (दि. 17) या महाथकबाकीदारांच्या घरासमोर महापालिका ढोल बडवणार आहे.

महापालिकेला शासनाकडून जीएसटीच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नानंतर घरपट्टी, पाणीपट्टी आणि विकास शुल्कातून महसूल प्राप्त होतो. कोरोना महामारीमुळे तर गेल्या दोन-अडीच वर्षांत महापालिकेच्या तिजोरीत कररूपी महसूल जमा होऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर त्याचा परिणाम झाला आहे. आता वर्षभरापासून सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले असले, तरी सवलतीच्या काळात झालेली करवसुली वगळल्यास, मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे पाठ वळवली आहे. थकबाकी भरली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर 350 कोटींहून अधिक झाला आहे. थकीत कर वसुलीकरिता मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी त्यास थकबाकीदार दाद लागू देत नसल्याने आता मनपाने ढोल वाजविण्याचा फंडा पुढे केला आहे. त्यामुळे तरी किमान लाजेखातर थकबाकीदार मनपाच्या तिजोरीत कर जमा करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपाने 1,258 इतक्या बड्या थकबाकीदारांची यादीच जाहीर करीत, संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या 1,258 थकबाकीदारांकडेच 49 कोटी 84 लाख 65 हजार इतका कर थकलेला आहे. या थकबाकीत 45 कोटी मागील थकीत कराच्या रकमेचा समावेश असून, चालू थकबाकी चार कोटी 32 लाख इतकी आहे.

विभागनिहाय थकीत कर
सातपूर विभाग – 5,79,63,003
पंचवटी विभाग – 69,73,960
सिडको विभाग – 6,00,73,139
नाशिकरोड विभाग – 8,46,40,525
नाशिक पश्चिम – 8,32,34,205
नाशिक पूर्व – 20,55,80,368
एकूण थकबाकी – 49,84,65,200

हेही वाचा:

The post नाशिक : महाथकबाकीदारांकडे घरपट्टीचे 50 कोटी appeared first on पुढारी.