शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

कॉंग्रेसचे धुळ्यात आंदोलन,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणार्‍या राज्यातील भाजपा-शिवसेना-अजित पवार गटाच्या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांदा, कपाशी तसेच इतर पिकाला भाव नाही. शेतकर्‍यासोबत युवक, विद्यार्थी, व्यापारी कामगार, बेरोजगार यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दारोदारी फिरायला लावणार्‍या सरकारच्या निषेधार्थ आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील क्यूमाईन क्लबजवळ धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळावरुन बोलतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी राज्यातील व केंद्रातील सरकारवर चांगलाच घणाघात केला. शासकीय योजना लोकांपर्यत राबविणे व त्याचा लाभ मिळवून देणे हे शासकीय प्रक्रीयेतील नेहमीचेच काम आहे. सरकार व शासकीय यंत्रणेचे ते कर्तव्यच आहे. मात्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नावाखाली राज्यातील भाजपा-शिवसेना-अजित पवार गटाचे सरकार शासनाच्या तिजोरीतील जनतेचा पैसा पाण्यासारखा खर्च करीत आहे. काँग्रेसच्या सरकारने आजपर्यंत असंख्य योजना राबविल्या. मात्र त्याचे कधीही भांडवल किंवा जाहिरातबाजी केली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांनी शेतकर्‍यांच्या कांदा-कपाशीला योग्य तो भाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र शेतकर्‍यांच्या ह्याच पिकाला कवडीमोल भाव देवून भाजपा-शिवसेना सरकार शेतकर्‍यांची थट्टा करीत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.

पंतप्रधान मोंदीचे भाषण स्क्रीनवर 

धुळे लोकसभेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांच्या भाषणांचा अंश आंदोलनाच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यात पंतप्रधान मोंदीनी कपाशी, कांद्याला भाव देवून, मनमाड-इंदूर रेल्वे प्रश्‍न मार्गी लावू या आश्‍वासनांची स्क्रीनवरील भाषणतून आठवण करुन देण्यात आली. त्यामुळे यावेळी लोकांनी पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.

धुळ्यात झालेल्या सत्याग्रह आंदोलनाला माजी खा.बापू चौरे, मनपा विरोधी पक्षनेते साबीर खान, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, ज्येष्ठ नेते रणजित पावरा, जि.प.सदस्य धिरज अहिरे, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.