नाशिक : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ शहरांच्या यादीत देशात पहिल्या क्रमांकावर येण्याचे नाशिककरांचे स्वप्न सातव्यांदा भंगल्यानंतर नाशिक महापालिकेने पुन्हा एकदा नव्या जोमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ची तयारी सुरू केली आहे. स्वच्छतेप्रती नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ६ व ७ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. (Swachh Survekshan 2024)

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण (Swachh Survekshan 2024) राबविण्यात येते. सर्वेक्षणाअंती देशभरातील स्वच्छ शहरांचा निकाल जाहीर केला जातो. २०२३ करिता देशपातळीवर राबविण्यात आलेल्या सातव्या स्वच्छ शहर स्पर्धेचा निकाल गेल्या पंधरवड्यात जाहीर करण्यात आला. ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिक शहराचा देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत पहिला क्रमांक यावा, हे नाशिककरांचे गेल्या काही वर्षांपासूनचे स्वप्न आहे. मात्र, यंदाही ही स्वप्नपूर्ती होऊ शकली नाही. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत गेल्या वर्षी नाशिक २०व्या स्थानी असलेले नाशिक शहर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत १६ व्या स्थानापर्यंत, तर देशभरातील ४४७० शहरांमध्ये ७५ व्या स्थानावरून ३९ व्या स्थानावर मजल मारू शकले. आता आठव्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ची (Swachh Survekshan 2024) घोषणा केंद्र शासनाने केली आहे. निदान आगामी स्पर्धेत तरी नाशिकचे देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिले येण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांकरिता नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सहभाग विनामूल्य असणार आहे.

नृत्य व पथनाट्य स्पर्धेचे विषय –
* ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे
* प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम
* स्वछ्तेप्रती नागरिकांचे कर्तव्य
* नदीपात्राचे होणारे प्रदूषण व संवर्धनाचे उपाय

विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे
सदर स्पर्धेतील नृत्य सादरीकरणास ४ ते ५ मिनटे व पथनाट्य सादरीकरणास ६ ते ८ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार ५०० व ५ हजार रुपये रोख पारितोषक देऊन गौरविण्यात येईल तसेच सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या प्रवेशिका ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभाग (मुख्यालय) येथे अथवा [email protected] या ई-मेल वर पाठवाव्यात.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेकडून 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४'ला सुरुवात appeared first on पुढारी.