Nashik : ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये मनपाचे हजारो विद्यार्थी सहभागी; स्मार्ट बोर्डमुळे कार्यक्रम सुकर

Pariksha Pe Charcha pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सोमवारी (दि.२९) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधानांचे मार्गदर्शन आत्मसात केले. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या स्मार्ट बोर्डमुळे हा कार्यक्रम सुकर बनला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोमवारी देशभरातील शाळांमध्ये करण्यात आले. नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ताणतणावाला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे या विषयावर भाष्य करताना इन्स्टाग्राम रिल्स बघण्याच्या सवयीबाबत विद्यार्थ्यांना काही सूचना केल्या. सध्या बरेच विद्यार्थी मोबाइल वापरतात. अनेक विद्यार्थ्यांना तर सतत मोबाइलवर रिल्स पाहायची सवय लागली आहे. सारख्या रिल्स पाहिल्याने वेळ वाया जाईल. झोप पूर्ण होणार नाही. जसे रिल्स पाहून मोबाइलची बॅटरी कमी होते तसे अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील ऊर्जादेखील कमी होते, असे पंतप्रधान यांनी सांगितले. पंतप्रधानांचा थेट प्रक्षेपित केला जाणारा हा संवाद महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्मार्ट बोर्डमुळे प्रत्यक्ष अनुभवला.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत महापालिकेच्या ८२ शाळा स्मार्ट स्कूल म्हणून विकसित करण्यात येत असून, या शाळांमधील ६५६ वर्गखोल्या, ६९ संगणक कक्ष, ८२ मुख्याध्यापक कक्ष, इंटरनेट, डिजिटल कन्टेंट आदी आधुनिक सुविधांनी मनपाच्या शाळा सुसज्ज करण्यात येत आहेत. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे महापालिकेच्या शाळांमधील गोरगरीब विद्यार्थी विविध प्रकारच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत.

हेही वाचा:

The post Nashik : 'परीक्षा पे चर्चा' मध्ये मनपाचे हजारो विद्यार्थी सहभागी; स्मार्ट बोर्डमुळे कार्यक्रम सुकर appeared first on पुढारी.