नाशिक : महापालिकेत मानधनावरील डॉक्टर भरतीवर लवकरच शिक्कामोर्तब

डॉक्टर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या नूतन बिटको रूग्णालयाचे परिपूर्ण सक्षमीकरण करण्याबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील मनुष्यबळाची कमतरता पाहता मानधन तत्वावर डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचे सुतोवाच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची कमतरता असल्याने वैद्यकीय विभागाने दीड महिन्यांपूर्वी मानधन तत्वावर ४५ डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ९० डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून निवड झालेल्या ४१ डॉक्टरांनी काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यामुळे त्यांना नियुक्तीचे आदेश देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त पुलकुंडवार यांच्याकडे सादर केला असता संबंधित भरतीप्रक्रिया ही शासनाच्या आरक्षण तथा रोष्टर पद्धतीने झालीच नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्तांनी ही भरती प्रक्रियाच रद्द करत वैद्यकीय विभाग आणि आस्थापना विभागास रोष्टर पध्दतीने भरतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, गेल्या एक महिन्यापासून संबंधीत दोन्ही विभागाकडून मात्र भरतीवरून टोलवाटोलवी सुरू असल्याने भरती प्रक्रियाच रखडून पडली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर आता नवीन बिटको रुग्णालयात बाह्य व आंतररूग्ण विभागासह शस्त्रक्रिया विभागही पुर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. परंतु, त्याठिकाणी पुरेशी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या नसल्याने रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिटको प्रमाणेच वडाळागाव, गंगापूरगाव, जुने नाशिक या भागातील मनपा रूग्णालयातही डॉक्टरांची वाणवा आहे. महापालिकेत डॉक्टरांची १८९ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या ६५ डॉक्टरांवरच रुग्णालयांचा कारभार सुरू आहे. कोरोना ओसरल्यानंतर कंत्राटी पध्दतीने भरती केलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सेवाही समाप्त झाल्याने मनुष्यबळाची कमतरता पुन्हा जाणवू लागली असून, आयुक्त पुलकुंडवार यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना भरती प्रक्रियेचा सुधारीत प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश देत येत्या काही दिवसात भरतीप्रक्रिया सुरू करण्याचे सुतोवाच दिले आहेत. दरम्यान, मनपाचे नूतन बिटकाे रूग्णालयाचे सक्षमीकरण करण्यात येणार असून, त्यासंदर्भात येत्या रविवारी (दि.१८) खातेप्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्त पुलकुंडवार यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच वेळीच उपचार न झाल्याने बिटको रूग्णालयाच्या आवारातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली. यामुळे या घटनेचीही दखल आयुक्तांनी घेतली असून, रूग्णालयाशी संबंधीत समस्या व अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

मागील रविवारी बिटको रूग्णालयाची पाहणी केली. या पाहणी आढळेल्या त्रृटी तसेच अडचणी यांचा एकत्रित अहवाल वैद्यकीय विभागाला सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार येत्या रविवारी (दि.१८) पुन्हा आढावा घेऊन कामे मार्गी लावली जातील. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयक्त मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेत मानधनावरील डॉक्टर भरतीवर लवकरच शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.