नाशिक : मालेगाव कॅम्प मॉड्यूलर असुविधांचे मॉडेल रुग्णालय

bjp www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून तब्बल सहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कॅम्प मॉड्यूलर रुग्णालयात सोयी – सुविधांची वाणवा असून, तेथील भोंगळ कारभाराने रुग्णसेवा प्रभावित झाल्याची तक्रार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन या रुग्णालयातील कामकाज सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

मनपा हद्दवाढ तसेच कॅम्प विभागाचा विचार करता, या भागात सुसज्ज रुग्णालय उभारणीची मागणी कोविड साथ पूर्वीच जोर धरत होती. त्यानुसार मनपाने अमेरिकन ट्रस्टच्या सहयोगातून कॅम्प रुग्णालयाचा कायापालट केला. जिल्ह्यातील पहिलेच मॉड्यूलर रुग्णालय बांधले गेले असले तरी त्याचा उद्देश मात्र सफल होताना दिसत नाही, असा सूर उमटत आहे. रुग्णालयात केसपेपर देणारा सावलीत आणि रुग्ण उन्हात अशी स्थिती आहे. भरपावसात रुग्णांना उभे राहावे लागते. काही रुग्ण चक्कर येऊन पडतात. तपासणी कक्षाबाहेर छत असले तरी पावसाचे पाणी रुग्णांवरच येतेच. तेव्हा त्याठिकाणी छत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर रुममध्ये रुग्ण तपासले जात नाहीत, रुग्ण समस्या सांगत असतानाच औषधी लिहिल्या जातात तसेच महिला व तरुण मुलींच्या स्त्रीविषयक समस्या ऐकून घेण्यासाठी सकाळच्या सत्रात महिला डॉक्टर्स उपस्थित नसतात. परिणामी महिलावर्ग संकोचामुळे समस्या न सांगता, त्रास अंगावर काढतात, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे प्रत्येक शिफ्टमध्ये महिला डॉक्टर्स नेमण्यात याव्यात. शिवाय, प्रसुती कक्ष, अतिदक्षता कक्ष सुरू करावा, कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. नागरी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. याप्रसंगी निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, विवेक वारुळे, दीपक पाटील, प्रवीण चौधरी, भाग्येश कासार, अतुल लोढा, प्रीतेश शर्मा, मोहन कांबळे, वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते.

सहा कोटी खर्च झाले, तेव्हा रुग्णांना ऊन व पावसापासून संरक्षण देण्यावर असा किती खर्च येणार होता? रुग्णालयात चेहरे व राजकीय ओळख पाहून रुग्णांवर इलाज करण्याची पद्धत बंद करावी. कागदोपत्रीच 24 तास डॉक्टर उपस्थित असतात. ठराविक डॉक्टरच रुग्ण तपासतात. प्रमुख डॉक्टर रुग्णसेवेपेक्षा मोबाईलवरच अधिक व्यग्र असतात. रुग्णांशी उर्मटपणे बोलणे बंद व्हावे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितीत असताना काही वैद्यकीय निकड व प्रसंग उद्भवला तर काय? – निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगाव कॅम्प मॉड्यूलर असुविधांचे मॉडेल रुग्णालय appeared first on पुढारी.