नाशिक : ‘जरीफबाबा’ च्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी तीन पथके

जरीफ बाबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला येथील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत अफगाणच्या निर्वासित सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा (28) यांचा मंगळवारी (दि. 5) सायंकाळी गोळी झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तीन पथके नेमली असून, ती परजिल्ह्यासह परराज्यात रवाना केली आहेत.

जरीफबाबा यांचा मंगळवारी सायंकाळी त्यांचा माजी वाहनचालक व इतर पाच जणांनी मिळून खून केला. त्यानंतर संशयितांनी जरीफबाबा यांच्या वाहन- चालकासह त्याच्या भावासही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघे जीव वाचून पळाल्याने मारेकर्‍यांचा बेत फसला. संशयितांनी जरीफबाबा यांची कार (क्र. एमएच 43 बीयू 7886) घेऊन पळ काढला होता. मात्र, हे वाहन संगमनेर येथील चंदनापुरी घाटात आढळून आले. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात संशयित रवींद्र तोरे (रा. कोळपेवाडी), पवन आहेर, गणेश पाटील (दोघे रा. येवला) त्यांच्यासह इतर तीन संशयितांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून ते मुंबई, अहमदनगर जिल्ह्यासह गुजरात राज्यात पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून संशयितांनी जरीफबाबा यांचा खून केल्याचे समोर आले आहे. संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिस येवला येथील सीसीटीव्हींची तपासणी करीत आहेत.

जरीफबाबा यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान दूतावासाशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली आहे. जरीफबाबा यांचे नातलग नाशिकला येणार असल्याने त्यांचा मृतदेह शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. संशयितांचा लवकरच शोध घेण्यात येईल. – सचिन पाटील, पोलिस अधीक्षक

हेही वाचा :

The post नाशिक : 'जरीफबाबा' च्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी तीन पथके appeared first on पुढारी.